पोर्तुगाल तुर्कीला 3-0 ने नमवून पुढील फेरीत
वृत्तसंस्था/ डॉर्टमंड (जर्मनी)
युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये पोर्तुगालने तुर्कीवर 3-0 असा विजय मिळविल्याने त्यांचा उपउपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे. या सामन्यात क्रिस्टियानो रोनाल्डोला एकही गोल नोंदविता आला नाही, एकासाठी त्याने साहाय्य केले आणि चार सेल्फीवेड्यांनी त्याच्यासाठी मैदानावर केलेले आक्रमण या सामन्यात पाहायला मिळाले.
नेहमीप्रमाणे रोनाल्डोवर लक्ष केंद्रीत होते. या पाच वेळच्या ‘वर्ल्ड प्लेयर ऑफ दि इयर’ने ब्रुनो फर्नांडिसला पास देऊन त्याच्यातर्फे करण्यात आलेल्या तिसऱ्या गोलात योगदान दिले. मात्र यावेळी रोनाल्डो स्वत: सहज गोलसाठी प्रयत्न करू शकला असता.त्यानंतर उत्तरार्धात वेगवेगळ्या वेळी तीन चाहत्यांनी मैदानात येऊन रोनाल्डोसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला. त्याने पहिले आमंत्रण आनंदाने स्वीकारले, पण बाकीच्या दोघांच्या बाबतीत तो नाराज दिसला.
पोर्तुगालची जर्सी घातलेला आणखी एक समर्थक फोन हातात घेऊन अंतिम शिटी वाजवल्यानंतर काही क्षणात रोनाल्डोकडे आला, तर दुसऱ्या एका व्यक्तीला सुरक्षा यंत्रणेने रोखून धरले. रोनाल्डो मात्र तुर्की संघाविऊद्ध गोल करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल अधिक दु:खी असू शकतो. बर्नार्डो सिल्वाच्या गोलने तुर्कीला 1-0 असे पिछाडीवर टाकल्यानंतर तुर्कीच्या अकायदिनने दिलेला बॅक-पास त्यांच्या गोलरक्षकाच्या बाजूने आणि थेट जाळ्यामध्ये गेला. पोर्तुगालने झेक प्रजासत्ताकवर 2-1 असा विजय मिळवला होता आणि गट एफमधून एक सामना बाकी असताना ते पुढील फेरीसाटी पात्र ठरले आहेत.