इंग्लंडच्या पहिल्या डावात पोपचे शतक
विंडीजविरुद्ध दुसरी कसोटी, पहिला दिवस : चहापानापर्यंत इंग्लंड 4 बाद 259
वृत्तसंस्था /नॉटिंगहॅम
गुरूवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीतील पहिल्या दिवसाच्या चहापानापर्यंत यजमान इंग्लंडने विंडीजविरुध्द 4 बाद 259 धावा जमविल्या. चहापानावेळी ओली पोप 115 धावांवर खेळत आहे. इंग्लंडच्या डकेटने अर्धशतक झळकविले. इंग्लंडने डावाला दमदार सुरूवात करताना 4.2 षटकात (26 चेंडूत) वेगवान अर्धशतक झळकविले. या मालिकेत इंग्लंडने लॉर्डस्च्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने विंडीजचा डावाने पराभव करुन आघाडी मिळविली आहे. या दुसऱ्या कसोटीत विंडीजने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. मात्र इंग्लंडच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. जोसेफच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर सलामीचा क्रॉले खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद झाला. त्यानंतर डकेट आणि पोप या जोडीने यांनी आक्रमक फटकेबाजी करत केवळ 26 चेंडूत संघाचे जलद अर्धशतक फलकावर लावले. या अर्धशतकामध्ये 10 चौकारांचा समावेश आहे. या अर्धशतकामध्ये डकेटचा 14 चेंडूत 33, तर ओली पोपचा 9 चेंडूत 16 धावांचा वाटा राहिला. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 19 षटकांत 105 धावांची शतकी भागिदारी केली. पण उपाहारापूर्वी विंडीजने ही जोडी फोडण्यात यश मिळविले. जोसेफच्या गोलंदाजीवर होल्डरने डकेटचा झेल टिपला. डकेटने 59 चेंडूत 14 चौकारांसह 71 धावा झोडपल्या. डकेटने आपले अर्धशतक 11 चौकारांसह 32 चेंडूत पूर्ण केले. इंग्लंडचे शतक 108 चेंडूत तर डकेट आणि पोप यांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी 105 चेंडूत झळकविली. उपाहारावेळी इंग्लंडने 26 षटकात 2 बाद 134 धावा जमविल्या होत्या. पोप 31 धावांवर खेळत होता.
खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला रुट सिल्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 29 चेंडूत 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. रुटने पॉपसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 37 धावांची भर घातली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या ब्रुकने पोपला बऱ्यापैकी साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 59 धावांची भागिदारी केली. सिंक्लेअरने ब्रुकला मॅपेंझीकरवी झेलबाद केले. ब्रुकने 34 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 36 धावा जमविल्या. इंग्लंडचे द्विशतक 211 चेंडूत फलकावर लागले. पोपने आपले अर्धशतक 5 चौकार आणि 1 षटकारासह 81 चेंडूत तर शतक 1 षटकार आणि 14 चौकारांसह 143 चेंडूत झळकविले. चहापानावेळी इंग्लंडने 4 बाद 259 धावापर्यंत मजल मारली. पोप 160 चेंडूत 1 षटकार आणि 14 चौकारांसह 115 धावांवर तर कर्णधार स्टोक्स 1 चौकारासह 15 धावांवर खेळत होते. विंडीजतर्फे अल्झारी जोसेफ व शेमार जोसेफ, सिल्स आणि सिंक्लेअर यांनी प्रत्येकी एकगडी बाद केला.
26 चेंडूत अर्धशतकाचा इंग्लंडचा विक्रम
विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात गुरूवारी खेळाच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 4.2 षटकात (26 चेंडू) जलद अर्धशतक नोंदविण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी क्रिकेटमध्ये इंग्लंडने 1994 साली ओव्हल मैदानावर झालेल्या द. आफ्रिका विरुद्धच्या कसोटीमध्ये 4.3 षटकात जलद अर्धशतक नोंदविण्याचा विक्रम केला होता पण हा विक्रम इंग्लंडने विंडीज विरुध्दच्या सामन्यात मागे टाकला. कसोटी क्रिकेटमध्ये जलद अर्धशतक नोंदविणाऱ्या संघांच्या यादीमध्ये इंग्लंड पहिल्या तीन स्थानावर आहे. 2002 साली मॅंचेस्टर येथे झालेल्या लंकेविरुद्धच्या कसोटीत इंग्लंडने 5 षटकात अर्धशतक झळकविले होते. या यादीत लंका चौथ्या स्थानावर आहे. लंकेने 2004 साली कराचीत पाक विरुद्ध 5.2 षटकात अर्धशतक नोंदविले होते. या यादीमध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे. भारताने 2008 साली चेन्नईत इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात 5.3 षटकात तसेच 2023 साली पोर्ट ऑफ स्पेन येथे विंडीजविरुद्ध 5.3 षटकात नोंदविले होते.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव चहापानापर्यंत 53 षटकात 4 बाद 259 (क्रॉली 0, डकेट 71, पोप खेळत आहे 115, रुट 14, ब्रुक 36, स्टोक्स खेळत आहे 15, अवांतर 8, अल्झारी जोसेफ, सिल्स, सिंक्लेअर, शमार जोसेफ प्रत्येकी एक बळी)