उशीत कापसाऐवजी पॉपकॉर्न
जगात आता विविध प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरल्या जात असून त्याबद्दल कळल्यावर असेही घडू शकते का असा प्रश्न पडत असतो. एक अशीच स्ट्रॅटेजी जपानच्या एका कंपनीकडून अवलंबिण्यात आली आहे. लोकांना पॉपकॉर्न खाणे अत्यंत पसंत असते, परंतु जपानची फूड कंपनी पॉपकॉर्नचा आणखी एक उपयोग दाखवून देत आहे.
आतापर्यंत कुशनिंग मटेरियल म्हणून कापूस किंवा फोमचा वापर केला जात असल्याचे पाहिले असेल. परंतु जपानची एक कंपनी याच्या बदल्यात पॉपकॉर्न ऑफर करत आहे. पॉपकॉर्नला कुशनप्रमाणे वापरता येते आणि खाताही येते असे कंपनीचे सांगणे आहे. हे पॉपकॉर्न स्टाइरोफोम पॅलेट्स आणि कार्डबोर्डचा पर्याय म्हणूनही वापरता येतात.
जपानची फूड कंपनी एझेची फूड्सने पॉपकॉर्न विकण्यासाठी नवी पंचलाइन वापरली आहे. पॉपकॉर्न मॅन्युफॅक्चरर आणि होलसलेर एचेजी फूड्स जपानच्या कोची सिटीत आहे. ही कंपनी पॉपकॉर्नला केवळ स्नॅकिंगसाठी नव्हे तर कुशनिंग मटेरियल म्हणूनही विकते. कंपनीच्या मॅनेजर शिहोको वाडा यांनी ही कल्पना एक सेमिनारमधून सुचली. तेथे एका इसमाने पॉपकॉर्नच्या पाकिटाचा उशी म्हणून वापर केला होता. यामुळे अनेक लोक हसू लागले होते. परंतु वाडा यांना स्नॅकला कुशन म्हणून वापरता येऊ शकते अशी कल्पना सुचली.
लोकांना पसंत पडली कल्पना
येथूनच आमच्या कंपनीकडून निर्माण होणाऱ्या पॉपकॉर्नचा कुशनिंग म्हणूनही वापर केला जाईल असा विचार केला. लोकांनी सर्वप्रथम याचा कुशन म्हणून वापर करावा आणि मग मनाला वाटेल तेव्हा ते खाल्ले जावेत, ते कचरा ठरणार नाहीत. या पॉपकॉर्नला पारदर्शक कागदात पॅक केले असून त्यावर एडिबल लिहिण्यात आले आहे. लोकांना पॉपकॉर्न खाता येतील, परंतु कागद खाण्याजोगा नाही असे त्यांनी सांगितले आहे. जपानच्या सोशल मीडियावर याची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. सर्वसाधारणपणे कुशनमध्ये भरण्यात येणाऱ्या गोष्टी वापरानंतर फेकून दिल्या जातात, परंतु याला खाता येता येणार आहे.