For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्याची ‘जलकन्या’ पूर्वी नाईकची बहारदार कामगिरी

06:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्याची ‘जलकन्या’ पूर्वी नाईकची बहारदार कामगिरी
Advertisement

राष्ट्रीय पातळीवरील जलतरण क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या पूर्वी रितेश नाईक या 11 वर्षीय जलतरणपटूने केलेली कामगिरी सर्वांनाच अचंबित करून टाकणारी आहे. हल्लीच भुवनेश्वरात झालेल्या 40व्या सब-ज्युनियर राष्ट्रीय जलतरण क्रीडा स्पर्धेत तिने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत कर्नाटक तसेच अन्य राज्यातील जलतरणपटूंना दिलेली झुंज भविष्यात योग्य प्रशिक्षण, पुरस्कर्ते आणि शासनाचा पाठिंबा मिळाला तर पूर्वी ही देशातील एक अव्वल जलतरणपटू बनू शकते हे कुणीही नाकारू शकणार नाही. हरवळे-साखळी येथील या जलकन्येने आपल्या प्रबळ इच्छाशक्ती तसेच कठोर मेहनतीच्या बळावर राष्ट्रीय पातळीवरील सब-ज्युनियर स्पर्धेत 50 मीटर फ्रिस्टाईलमध्ये सुवर्ण, 100 व 400 मीटर फ्रिस्टाईलमध्ये रौप्यपदके तर 200 मीटर फ्रिस्टाईलमध्ये कास्यपदक मिळवून गोव्याला चार राष्ट्रीय पदके मिळवून दिली.

Advertisement

खेलो इंडिया सेंटरमुळे खेळ बहरला

कांपाल येथील ‘खेलो इंडिया स्टेट सेंटर फॉर एक्सलन्स’मध्ये सामिल झाल्यापासून पूर्वीचा खेळ बहरला. तेथील जलतरण खेळातील प्रशिक्षक सुजीत टी. ए. यांच्या कुशल मार्गदर्शन आणि प्रशिक्षणामुळे जलतरणात असलेले तिचे कौशल्य अधिक विकसित झाले. परराज्यातील जलतरण स्पर्धेत भाग घेऊन आपले टाईमिंगही तिने वधारले.

Advertisement

गेल्या वर्षीही पूर्वीने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भाग घेतला होता, मात्र विविध शर्यतींची अंतिम फेरीत जाण्यात तिला अपयश आले होते. आरंभीच्या अपयशाने खचून जाता अधिक जोमाने कुजिरातील मुष्टिफंड स्कूलमध्ये शिकणाऱ्या पूर्वीने आपल्या कर्तृत्वावर अधिक विश्वास ठेवत तसेच प्रशिक्षक सुजीतच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय पदकांना गवसणी घातली व राष्ट्रीय जलतरणच्या पटावर आपले नाव अधोरेखित केले.

पदकांची एवढी अपेक्षा सुजीत यांना नव्हती

‘खरं सांगयचे तर मला पूर्वीकडून केवळ सुधारीत कामगिरीची अपेक्षा यंदाच्या सब-ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत होती, असे तिचे प्रशिक्षक सुजीत म्हणाले. निश्चितच तिची टाइमिंग काही सीनियर जलतरणपटूंना सोडून इतर खेळाडूंपेक्षा सरस होतीच, पण पदकांची अपेक्षा तर मी केलीच नव्हती. पूर्वीला योग्य वयात प्रोफेशनल ट्रेनिंग मिळाल्यानेच तिची कामगिरी बहरली, असे तिचे प्रशिक्षक सुजीत म्हणाले.

आई नम्रताचा पाठिंबा मोलाचा

कुठल्याही क्रीडा प्रकाराता प्रोफेशनल बनायचं असेल तर पालकांचा पाठिंबा हा मोलाचा असतो. पूर्वीची बहीण प्राची ही सुद्धा जलतरणपटू आहे. हरवळेत पूर्वीच वडील एक हार्डवेअर दुकान चालवतात. त्यामुळे प्रारंभी सराव आणि स्पर्धांसाठी हरवळे ते पेडे जलतरण संकुल हा प्रवास तिची आई नम्रता नाईक हिने आपल्या दोन्ही मुलींना स्कूटरवरून घेऊन केला. केवळ 4 वर्षांची असताना पूर्वी जलतरणात आली. केवळ हौस म्हणून या खेळात आलेल्या पूर्वीला आता प्रोफेशनल जलतरणपटू बनण्याचा मानस आहे.

 प्रगत प्रशिक्षण घेण्यासाठी पणजीत

कांपालवर असलेल्या ‘खेलो इंडिया सेंटर फॉर एक्सलन्स’मध्ये प्रवेश घेतल्यापासून हरवळे ते कांपाल हा प्रवास तर पूर्वी तसेच तिच्या आईसाठी जिवघेणा तसेच अत्यंत कंठाळवाणा होता. सकाळी लवकर उठून 5.00 वाजता ट्रेनिंग सेंटवर येणे व त्यानंतर सराव हे नेहमीच शक्य तर नव्हतेच. शिक्षणावरही त्याचा परिणाम होत होता. शेवटी तिच्या आईने प्रशिक्षणासगाठी अधिक वेळ मिळावा आणि शिक्षणाकडेही पूर्वीचे दुर्लक्ष होऊ नये यासाठी तिची शाळाही बदलली व तिला मुष्टिफंडामध्ये प्रवेश मिळवून दिला. आता भव्यिष्यात गोव्याच्या या जलकन्येकडून राष्ट्रीय पातळीवर आणि प्रामुख्याने पुढे सीनियर पातळीवरील जलतरण स्पर्धेत भाग घेऊन गोव्यासाठी तसेच देशासाठी अधिक पदके मिळविण्याची मनिषा आहे.

पूर्वी नाईकची जलतरणातील कामगिरी

  • 2019 मध्ये राज्य जलतरण स्पर्धेत ब्राँझपदक.
  • 2020 मध्ये बेळगावात झालेल्या स्पर्धेत 50 मी. फ्रिस्टाईल व 50 मी. ब्र्रेस्टस्ट्रोकमध्ये ब्राँझ.
  • 2021 मध्ये राज्य जलतरणमध्ये फ्रिस्टाईल शर्यतीत सुवर्ण.
  • जोधपूरात झालेल्या राष्ट्रीय अंडरवॉटर फिनस्विमींगमध्ये 50 व 100 मी. मोनोफिनमध्ये प्रत्येकी एक सुवर्ण व ब्राँझ.
  • 2022 मध्ये रोटरी क्लब फोंडा आयोजित स्पर्धेत 4 सुवर्ण.
  • 2022 राज्य जलतरण स्पर्धेत 5 सुवर्णपदके.
  • 2023 मध्ये कोल्हापूरात झालेल्या आमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत प्रत्येकी एक रौप्य व ब्राँझ.
  • 2023 मध्ये सीनियर गटात भाग घेऊन रिलेत ब्राँझपदक.
  • 2023 मध्ये राज्य सब-ज्युनियर जलतरण स्पर्धेत 7 सुवर्णपदके व तीन नवीन स्पर्धा विक्रमांची नोंद.
  • 2024 मध्ये कोल्हापूरात झालेल्या आमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत 2 ब्राँझपदके.
  • 2024 मध्ये बेळगावातील पीव्हीआर आंतर राज्य जलतरण स्पर्धेत 4 ब्राँझ व एक रौप्यपदक.
  • 2024 मध्ये फोंडा येथे झालेल्या रोटरी क्लब स्पर्धेत 4 सुवर्णपदके.
  • 2024 मध्ये एफएफएल समर स्वीम स्पर्धेत 2 सुवर्ण व 4 रौप्य.
  • 2024 राज्य जलतरण स्पर्धेत 5 सुवर्ण व 1 रौप्य. 4 नवीन स्पर्धा विक्रम.
  • ओडिशातील राष्ट्रीय सब-ज्युनियर जलतरण स्पर्धेत 1 सुवर्ण, दोन रौप्य व एक ब्राँझ.

-संदीप मो. रेडकर

Advertisement
Tags :

.