For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेस वॉकमध्ये भारताची खराब सुरुवात

06:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेस वॉकमध्ये भारताची खराब सुरुवात
Advertisement

20 किमी चालण्याच्या शर्यतीत प्रियांका गोस्वामी, विकास सिंग अपयशी : परमजीत सिंगही स्पर्धेबाहेर,बॉक्सर निशांतची आगेकूच

Advertisement

वृत्तसंस्था /पॅरिस

भारतीय धावपटू प्रियांका गोस्वामी गुरुवारी पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 20 किमी रेस वॉकमध्ये 41 व्या स्थानावर राहिली. 28 वर्षीय धावपटूने तिच्या दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत ट्रोकाडेरो येथे 1:39:55 अशी वेळ नोंदवली. पॅरिसमधील या कार्यक्रमात ती एकमेव भारतीय सहभागी होती. चीनच्या यांग जियायुने 1:25:54 च्या हंगामातील सर्वोत्तम वेळेसह सुवर्णपदक जिंकले. स्पेनच्या मारिया पेरेझनेही हंगामातील सर्वोत्तम 1:26:19 च्या वेळेसह रौप्यपदक जिंकले तर ऑस्ट्रेलियन अॅथलीट जेमिमा मॉन्टेगने 1:26:25 च्या ओशियन विक्रमासह कांस्यपदक पटकावले. याशिवाय, पुरुष गटात विकास सिंह 30 व्या तर परमजीत सिंह बिष्ट 37 व्या स्थानावर राहिले. 28 वर्षीय विकास 1:22:36 इतकी वेळ नोंदवली. परमजीतने 1:23:48 अशी वेळ नोंदवली. दुसरीकडे अन्य भारतीय खेळाडू अक्षदीप सिंहला शर्यत देखील पूर्ण करता आली नाही. गुरुवारी अॅथलेटिक्समधील इव्हेंटला सुरुवात झाली. 20 किमी चालण्याच्या शर्यती पुरुष व महिला गटात भारताला एकही पदक जिंकता आले नाही.

Advertisement

तिरंदाजीत महाराष्ट्राचा प्रवीण जाधव पराभूत

भारतीय तिरंदाज प्रवीण जाधवला पुरुषांच्या तिरंदाजी वैयक्तिक स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. त्याची स्पर्धा चीनच्या काओ वेनचाओशी होती. वेंचाओने 64 च्या फेरीतील सामन्यात प्रवीणचा 6-0 च्या एकतर्फी फरकाने पराभव केला. त्यांनी 29-28, 30-29 आणि 28-27 असा विजय मिळवला.

टेटेमध्ये मनिका,श्रीजाही पराभूत

टेबल टेनिसमध्ये मनिका बात्रा व श्रीजा अकुला यांचे आव्हानही संपुष्टात आले. श्रीजाला चीनच्या जागतिक अग्रमानांकित यिंगशा सुनकडून 0-4 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. श्रीजाने ही लढत 10-12, 10-12, 8-11, 3-11 अशी गमावली. या क्रीडा प्रकारात शेवटची सोळा फेरी गाठणारी ती मनिका बात्रानंतरची दुसरी खेळाडू बनली होती. मनिका बात्रालाही या फेरीत जपानच्या मियु हिरानोकडून 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारात भारताच्या अंजुम मोदगिल व सिफ्ट कौर सामरा यांचे आव्हानही संपुष्टात आले. पात्रता फेरीत अंजुमने 584 गुण नोंदवला.

निशांत देवची आगेकूच, निखत झरीनचे आव्हान संपुष्टात

भारताचा बॉक्सर निशांत देवने पुरुषांच्या 71 किलो वजन गटात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले तर निखत झरीनचे आव्हान दुसऱ्या फेरीत समाप्त झाले. निशांतने इक्वेडोरच्या जोस गॅब्रियल रॉड्रिग्ज टेनोरिओवर 3-2 अशा गुणफरकाने विजय मिळविला. निशांतने आक्रमक सुरुवात करताना जोसला सरळ व अचूक ठोसे लगावत पहिली फेरी जिंकली. पण दुसरा फेरीत जोसने जोरदार मुसंडी मारत निशांतला दमवले. पण अखेरीस निशांतने ही लढत 3-2 अशा निसटत्या फरकाने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. भारताची स्टार मुष्टीयोद्धा निखत झरीन हिचे आव्हान संपुष्टात आले आहे. निखत झरीन थायलंडच्या एशियन चॅम्पियनकडून पराभवाचे तोंड पहावे लागले. निखत  ही 5-0 अशा फरकाने थायलंडच्या खेळाडू ऊ यू कडून पराभूत झाली.

Advertisement
Tags :

.