छत्रपती शिवाजी उद्यानातील क्रीडा साहित्याची दुरवस्था
महानगरपालिकेचे दुर्लक्ष : नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी
बेळगाव : छत्रपती शिवाजी उद्यानातील लहान मुलांच्या क्रीडा साहित्याची दुरवस्था झाली आहे. झोपाळे तसेच सीसॉ तसेच इतर क्रीडा साहित्य मोडून पडले आहे. त्यामुळे उद्यानामध्ये खेळण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांना पुन्हा माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या क्रीडा साहित्याची दुरुस्ती अथवा नवीन साहित्य बसवावे, अशी मागणी केली जात आहे. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात दररोज शेकडोजण फिरण्यासाठी येत असतात. सकाळी मॉर्निंग वॉकर्स तर सायंकाळी लहान मुलांची उद्यानामध्ये गर्दी होत असते.
परंतु उद्यानामधील क्रीडा साहित्याची दुरवस्था झाल्यामुळे चिमुकल्यांचा हिरमोड होत आहे. झोपाळे तसेच इतर साहित्य मोडून पडले असल्याने त्यांना इतर उद्यानांमध्ये जावे लागत आहे. छत्रपती शिवाजी उद्यानामधील या प्रकारामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेकडून नवीन साहित्य बसविण्यात आले होते. परंतु दररोज उद्यानामध्ये येणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे ते साहित्य वरचेवर खराब होत आहे. त्यामुळे या साहित्याची दुरुस्ती करून चिमुकल्यांना खेळण्यासाठी ते पुन्हा उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.