ग्राहक वाद निवारण आयोग खंडपीठावर पीठासीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी
बेळगाव : राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचे खंडपीठ बेळगाव येथे स्थापन करण्यात आले आहे. मात्र अद्याप अध्यक्ष, सदस्यांसह पीठासीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात न आल्याने वेळेवर निकाल मिळत नसल्याने समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे पक्षकारांसह वकिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी लवकरात लवकर पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बार असोसिएशनच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात, जलद व सुलभ न्यायासाठी बेळगाव येथे राज्य ग्राहक आयोग खंडपीठ स्थापन करण्यात आले. खंडपीठ स्थापन करण्यात आले असले तरी त्याठिकाणी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे खंडपीठाचे कामकाज ठप्प होत असून याचा वकील व पक्षकारांना फटका बसत आहे. यामुळे खंडपीठाचे कामकाज सुनिश्चित करण्यासाठी त्वरित पीठासीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी अॅड. बसवराज मुगळी, अॅड. शितल रामशेट्टी, अॅड. वाय. के. दिवटे, अॅड. विजयकुमार पाटील, अॅड. विश्वनाथ सुलतानपुरी, अॅड. सुमितकुमार अगसगी यांच्यासह वकील उपस्थित होते.