मध्यवर्ती बसस्थानकात स्वच्छतेचा बोजवारा
सीबीटी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी : स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची आवश्यकता
बेळगाव : स्मार्टसिटी योजनेंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून मध्यवर्ती बसस्थानक निर्माण करण्यात आले आहे. मात्र बसस्थानकात अस्वच्छता व मोकाट जनावरांचा वावर प्रकर्षाने दिसून येत आहे. तसेच भटक्मया कुत्र्यांचा वावरही नित्याचाच झाला असून, संपूर्ण बसस्थानक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, बसस्थानकातील कचरा डेपोही हाऊसफुल झाला आहे. यामुळे कचरा भरून ठेवण्यात आलेले बॅग्स बाहेरच ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. बसस्थानक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरवासियांसह इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना अनुकूल व्हावे यासाठी स्मार्टसिटी योजनेअंतर्गत मध्यवर्ती बसस्थानक निर्माण करण्यात आले. प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच बसस्थानकात स्वच्छता रहावी, यासाठी ठिकठिकाणी डस्टबिन ठेवण्यात आले होते. मात्र प्रवासी याचा वापर करत नसल्याचे दिसून आले. परिणामी प्रवासी कचरा बसस्थानकातच टाकून जात असल्याचे अनेकवेळा पहावयास मिळाले. यामुळे संपूर्ण बसस्थानक परिसरात कचराच दिसून येत आहे.
गुटखा खाऊन थुंकण्याचे प्रकार
बसस्थानक प्रशासनाने स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर कचरा उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची गरज आहे. मात्र काही कर्मचारीच स्वच्छतेचे काम करत असल्याचे दिसून आले. याचबरोबर अस्वच्छतेचा प्रवाशांवर परिणाम होणार नाही, याचीही काळजी घेण्याची आवश्यकता असून वेळेवर कचरा उचल करण्याची गरज आहे. बसस्थानकात येणारे प्रवासी गुटखा खाऊन ठिकठिकाणी थुंकत आहेत. यामुळे बसस्थानकातील भिंतींवर लाल पट्टे उठून दिसत आहेत. यासाठी प्रशासनाने वाढीव स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून बसस्थानकातील कचरा काढण्याची मागणी जोर धरत आहे.
मोकाट जनावरे-भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज
मध्यवर्ती बसस्थानकात मोकाट जनावरे व भटक्मया कुत्र्यांचा वावरही मोठ्या प भाणात वाढला आहे. यामुळे बसचालकांना बस चालवताना अडचणी येत आहेत. याचा प्रवाशांसह नागरिकांवरही परिणाम होत असून यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. मात्र बसस्थानक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. भटकी जनावरे सर्रासपणे बसस्थानकात वावरत असून बसस्थानकातच ठाण मांडत आहेत. यामुळे बसस्थानकात अस्वच्छता पसरत आहे. परिणामी प्रवाशांना आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याचा धोका निर्माण होत आहे. भटकी कुत्रीही बसस्थानकात फिरत असून, प्रसंगी प्रवाशांचा चावा घेण्याचाही धोका निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाने भटक्मया जनावरांसह कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांसह नागरिकांतून होत आहे.