पूजा सिंगचा नवा राष्ट्रीय विक्रम
लिमा : येथे सुरू असलेल्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताची महिला अॅथलिट पूजा सिंगने महिलांच्या उंच उडी प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. या कामगिरीमुळे पूजा सिंगने या क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. महिलांच्या उंचउडी या क्रीडा प्रकारात पूजा सिंगने नवा राष्ट्रीय विक्रम करताना 1.83 मीटरची नोंद केली. या क्रीडा प्रकारातील ब गटातील दुसऱ्या पात्र फेरीमध्ये पूजा सिंगने दुसरे स्थान मिळविले आहे.
या स्पर्धेत पुरूषांच्या 3000 मी. स्टिपलचेस प्रकारामध्ये भारताच्या शाहरुख खानने नवा राष्ट्रीय विक्रम करताना 8 मिनीटे 45.12 सेंकंदाचा अवधी घेतला. लिमामधील ही स्पर्धा 28 ते 31 ऑगस्ट दरम्यान होत असून या स्पर्धेमध्ये भारताच्या 43 सदस्यांनी आपला सहभाग दर्शविला आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारताचे 23 पुरूष आणि 20 महिला सहभागी झाल्या आहेत. पुरूषांच्या भालाफेकमध्ये दिपांशु शर्मा तसेच गोळाफेकमध्ये अनुरागसिंग कलेर यांच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे.