For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूजा शर्मा घाबरली अटकेला!

02:42 PM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
पूजा शर्मा घाबरली अटकेला
Advertisement

अटकपूर्व जामिनासाठी केला अर्ज : कोर्टाने एसआयटीला दिली नोटिस,आगरवाडेकर घर मोडतोड प्रकरण

Advertisement

पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबियांचे घर पाडण्यासाठी बाउन्सरांचा वापर केल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मुंबई येथील पूजा शर्मा हिने एका बाजूने पोलिसांसमोर येणे टाळले आहे आणि दुसऱ्या बाजूने अटक होण्याच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून वेळ काढण्याचा प्रयत्न केला आहे. पूजा शर्माच्या या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या बुधवारी निर्णय देण्यात येणार आहे. पूजा शर्मा हिने रविवारी क्राईम ब्रांचने पाठवलेल्या समन्सला उत्तर देताना, सोमवारी चौकशीसाठी येणे शक्य नसल्याचे कळविले होते. त्या दिवशी आपल्याला आणखी काही महत्वाचे काम असल्याने चौकशीसाठी दुसरी कोणतीही तारीख देण्याची विनंती पोलिसांना केली होती. याआधीही हणजुण पोलिसांनी पाठवलेल्या समन्सला पूजा शर्माने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

क्राईम ब्रांचच्या एसआयटीला नोटिस

Advertisement

पूजा शर्माने पणजीच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर काल सोमवारी सुनावणी घेण्यात आली असता न्यायालयाने क्राईम ब्रांचच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) नोटीस पाठवून बुधवारी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे कळविले आहे. एसआयटीच्या तपास अधिकाऱ्याला या प्रकरणाची पोलीस केस डायरी घेऊन हजर राहण्यास बजावले आहे.

एफआयआरमध्ये अधिक कलमे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या एफआयआरमध्ये भादंसंच्या कलम- 365 आणि 427 नमूद करण्यात आले असले तरी नंतर त्यात आणखी कलमे आणि संशयितांची नावे जोडण्यात आली आहेत.

अर्शद ख्वाजा, बाऊन्सरांच्या अर्जावर आज निवाडा

या प्रकरणातील दोनापावला येथील रिअल इस्टेट एजन्ट अर्शद ख्वाजा याने आणि तीन महिला बाऊन्सर्सनी केलेले जामीन अर्ज म्हापसा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणीसाठी आले असता दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. त्यावरील निवाडा आज मंगळवारी देण्यात येणार आहे.

 

Advertisement
Tags :

.