गाजलेल्या नोकरभरतीप्रकरणी पूजा नाईक यांचा बाँबगोळा
एक मंत्री, एक संचालक, अभियंत्याचाही समावेश : 600 नोकऱ्यांसाठी 16 कोटींची लाचखोरी, आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
पणजी : राज्यात 2019 ते 2021 या काळात कथित नोकरभरती प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा संशय आल्याने यापूर्वीच वातावरण ढवळून निघाले होते. आता त्यातील मुख्य सूत्रधार पूजा नाईक या महिलेने काल शुक्रवारी अनपेक्षित घडामोडीत नोकरभरतीत तब्बल 16 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावा केला. एवढेच नव्हे, तर आपण सरकारी खात्याचा एक संचालक, बांधकाम खात्यातील एक अभियंता, एक आयएएस अधिकारी तसेच भाजप सरकारातील एका मंत्र्यांकडे मिळून तब्बल 16 कोटी रुपये दिले होते, असा गौप्यस्फोट केल्याने राज्यात खळबळ माजली आहे.
म्हापसा येथे देव श्री बोडगेश्वराला साक्षी ठेवून मंदिराच्या प्रांगणात राहून पूजा नाईक यांनी पत्रकारांसमोर हा बाँबगोळा फोडला. पूजा नाईक यांनी सांगितले की, 2019 ते 2021 या काळात भाजप सरकारच्या काळात झालेल्या नोकरभरतीत कोट्यावधी ऊपयांचा व्यवहार झाला आहे. नोकरीसाठी सरकारी खात्यातील एक संचालक आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंता (इंजिनिअर) यांना कोट्यावधी ऊपये देण्यात आलेले आहेत. यामध्ये भाजप सरकारातील मंत्रीही असल्याने या सर्वांची नावे लवकरच उघड करणार असल्याचा इशाराही पूजा नाईक यांनी दिला आहे.
सहाशे जणांचे 16 कोटी रुपये
पूजा नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरी नको तर 24 तासांत पैसे परत करतो, असे सांगून संबंधित मंत्र्याने नोकऱ्यांसाठी पैसे घेतले होते. सुमारे 600 नोकऱ्यांसाठी मंत्र्यांपर्यंत 16 कोटी रुपये पोहचलेले आहेत. हे रुपये आपण स्वत: त्यांच्याकडे दिलेले आहेत, असेही त्या म्हणाल्या.
पूजा नाईक यांना मिळावे संरक्षण
हे प्रकरण दडपू नये, किंवा पूजा नाईक यांना कोणताही धोका पोहचू नये, यासाठी पूजा नाईक यांना पूर्णपणे संरक्षण मिळावे, अशी मागणी आता लोकांमधून होत आहे. हे प्रकरण उजेडात येण्यासाठी आणि मंत्र्याचे नाव कळण्यासाठी पूजा नाईक यांना संरक्षण देण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.
1.पैसे घेणारा तो मंत्री सध्या सावंत सरकारात
नोकऱ्या मिळवून देतो, असे सांगणारा तो मंत्री सध्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारात आहे. मंत्र्याने लाच घेतलेले कोट्यावधी ऊपये परत केले नाही, तर नाव उघड करणार आहे. घडलेल्या सर्व व्यवहाराची माहिती भक्कम पुराव्यासह मुख्यमंत्र्यांना देणार आहे, असे पूजा नाईक म्हणाल्या.
2.दोन हजारांच्या, पाचशेच्याच नोटा आणा...
हा व्यवहार दोन हजारांच्या व पाचशे ऊपयांच्या नोटांनी झाला होता. मंत्र्याने, संचालकाने, अभियंत्याने याच नोटांचा आग्रह धरला होता. अन्य नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या. केवळ ‘हार्ड कॅश’नेच व्यवहार झाला, असेही पूजा म्हणाल्या.
3.पर्वरीतील दोन कार्यालयात व्यवहार
आपण नोकऱ्यांसाठी पर्वरी येथील दोन कार्यालयांमध्ये कोट्यावधी ऊपये दिले होते. एका मंत्र्याच्या सेक्रेटरीकडे ते दिले होते. त्या सेक्रेटरीकरवी मंत्र्यापर्यंत कोट्यावधी रुपये पोहोचल्याचाही दावा पूजा नाईक यांनी केला आहे.
4.पर्वरी सचिवालयातही व्यवहार
पर्वरी येथील सचिवालयातही नोकरीसाठी रुपयांचा व्यवहार झाला. त्यासाठी संचालकाकडे अनेक बैठकाही झाल्याचा दावा पूजा नाईक यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंताही बैठकांना हजर असायचा, असे नाईक यांनी सांगितले.
दोन दिवसांत रुपये परत द्यावे, अन्यथा सर्वांची नावे जाहीर करु : पूजा
कोट्यावधी रुपये घेतले, तरीही नोकऱ्या देण्यात आलेल्या नसल्याने आपण त्यांच्यांकडे रुपयांची मागणी करत असते, पण त्या मंत्र्याकडून टाळाटाळ केली जात आहे. येत्या दोन दिवसांत जर मंत्र्याने नोकरी नव्हे, दिलेले पैसे परत केले नाहीत, तर सरकारी खात्यातील संचालक, अभियंता आणि मंत्र्याचेही नाव उघड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.