पूजा नाईकचे आरोप तथ्यहिन
तपासात सापडले नाहीत कोणतेही पुरावे पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता यांची माहिती
राहूल गुप्ता म्हणाले...
- मंत्री, अधिकाऱ्यांविरुद्धनाहीपुरावा
- पूजानाईकवरतीन आरोपपत्र दाखल
- ‘ती’ डायरीअन्तन्वीचाही नाही पत्ता
- ‘त्या’ फ्लॅटमध्येराहतातविद्यार्थी
- मगोसंदर्भातीलदाव्यालाहीनाही पुरावा
- पुजाच्याफोनमध्येमुलींचा अभ्यासक्रम
- परतकेलेलाफोन विकला उत्तर प्रदेशात
- पूजाच्याखात्यात8 कोटींचा व्यवहार
- तीनमहिनेहोती ‘फाईव स्टार’मध्ये
- फसलेल्यांनीपोलिसांशीसंपर्क साधावा
पणजी : ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईक हिने सरकारी अधिकारी आणि एका मंत्र्यावर केलेले आरोप तथ्यहिन असून तिने पेलेल्या आरोपासंदर्भात गुन्हा शाखेने सखोल तपासणी केली असता कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. तपासाअंती पूजाने केलेले आरोप खोटे असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. पूजाने नोकरीसाठी लोकांकडून पैसे घेतले होते आणि त्या लोकांना नोकरी मिळालेली नसल्याने ते पूजाकडे पैशांची मागणी करीत आहेत. आपले खापर कुणाच्यातरी माथी मारावे म्हणून पूजा नाईक इतरांवर आरोप करीत असल्याचा संशय आहे, अशी माहिती गुन्हा शाखेचे अधीक्षक राहूल गुप्ता यांनी दिली. काल मंगळवारी पणजीतील पोलिस मुख्यालयाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुप्ता यांनी वरील माहिती दिली. यावेळी त्यांच्या सोबत गुन्हा शाखेचे उपअधीक्षक सूरज हळर्णकर, निरीक्षक निनाद देऊलकर उपस्थित होते. दोन सरकारी अधिकारी आणि एक मंत्री 17.68 कोटी ऊपयांच्या या घोटाळ्यात सहभागी होते, या पूजा नाईक हिच्या दाव्याची पुष्टी करण्यासाठी गोवा गुन्हे शाखेला कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
पुजावर तीन आरोपपत्र दाखल
संशयित पूजा नाईक हिच्यावर डिचोली, म्हार्दोळ, पर्वरी आणि पणजी पोलिसस्थानकात फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे यासह पाच गुन्हेगारी प्रकरणे आहेत. यापैकी तीन तक्रारींचा तपास करून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहिता कलम 318(4) अंतर्गत नोंदवलेला म्हार्दोळ पोलिसस्थानकातील तक्रार अधिक सखोल तपासासाठी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
डायरी अन् तन्वीचाही पत्ताच नाही
पूजा नाईक हिने 613 नोकरी इच्छुकांची नावे डायरीमध्ये असल्याचा दावा केला होता. त्या डायरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती डायरी तन्वी नाईक हिच्याकडे आहे, असे पूजाने सांगितले. तन्वीची चौकशी केली असता आपण तिला प्रत्यक्षात कधी भेटले नाही असे पूजाने पोलिसांनी सांगितले. त्यामुळे तन्वी आणि डायरी पोलिसांना मिळालीच नाही.
त्या फ्लॅटमध्ये राहतात विद्यार्थी
पर्वरीतील ज्या फ्लॅटमध्ये आपण रोख रक्कम दिली,असा दावा पूजाने केला होता त्या फ्लॅटमध्ये गेल्या काही वर्षापासून विद्यार्थी राहत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तो फ्लॅट सरकारी अधिकाऱ्यांनी कधी घेतलाच नव्हता, असे तपासात उघड झाले आहे.
मगोसंदर्भातील दाव्यालाही नाही पुरावे
मगो पक्षाच्या कार्यालयात काम करताना एका मंत्र्याने त्या सरकारी अधिकाऱ्यांची ओळख करून दिल्याचा आरोप पूजाने केला होता, मात्र पूजा मगो पक्षाच्या कार्यालयात काम करीत असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाही.
परत केलेला फोन विकला उत्तरप्रदेशात
पूजाकडे असलेल्या 2 फोनपैकी एक जप्त करण्यात आला होता. दुसरा तिला परत देण्यात आला कारण तो तिच्या मुलींच्या ऑनलाईन शिक्षणाशी जोडलेला होता. जप्त केलेला फोन तिला परत दिल्यानंतर तो फॉरमॅट करून नाईकने उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला विकला. पूजाच्या कॉल रेकॉर्डमध्ये तिने आरोप केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही संवाद दिसून आले नाही, असे गुप्ता यांनी सांगितले.
पूजा कुटुंबाच्या खात्यात 8 कोटींचा व्यवहार
पोलिसांनी आर्थिक तपासणी केली तेव्हा पूजा नाईक, तिचा पती आणि तिच्या मुलींच्या बँक खात्यांमध्ये 8.06 कोटी ऊपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या पैशांचा वापर त्यांनी आलिशान वाहने, दागिने खरेदी करण्यासाठी आणि मालमत्ता बांधण्यासाठी केला असल्याचे तपासात उघड झाले आहे.
तीन महिने होती ‘फाईव स्टार’मध्ये
नोकरीसाठी पैसे दिलेल्यांनी ते परत मागण्यास प्रारंभ केल्याने त्यांच्यापासून लपण्यासाठी ती गेल्या 3 महिन्यांपासून कदंब पठारावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होती, असे गुप्ता यांनी सांगितले. फसवणुकीचे पैसे शोधण्यासाठी आणि परत मिळवण्यासाठी पोलिस अधिकारी पूजाच्या मालमत्तेची तपासणी करत आहेत. पूजा नाईक हिने नावे दिलेल्या सरकारी अधिकाऱ्यांची सध्या सुरू असलेल्या नोकरी घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्यात आली का? असे विचारले असता, गुप्ता म्हणाले की कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याची चौकशी करण्याची परवानगी घेण्यापूर्वी पुरेसे पुरावे आवश्यक आहेत. आम्हाला कोणताही पुरावा सापडला नाही. त्यामुळे परवानगी मागण्याचा प्रश्न येत नाही, असे गुप्ता म्हणाले. सध्या सुरू असलेल्या नोकरी घोटाळ्यात पूजा नाईक हिच्या विरोधात तक्रारी असलेल्या लोकांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी गुन्हे शखेशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.