पूजा खेडकरची सेवेतून हकालपट्टी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना प्रशासकीय सेवेतून तत्काळ बाहेर करण्यात आले आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि अन्य मागासवर्गीय असल्याचे बनावट प्रमाणपत्र बाळगल्याचा आरोप आहे. त्यांनी आपण दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळविल्याचाही आरोप आहे.
केंद्र सरकारने त्यांच्यावरील आरोपांची पडताळणी केल्यानंतर ते खरे असल्याचे आढळून आल्याने कठोर करवाई करण्याचा निर्णय घेतला. भारतीय प्रशासकीय सेवा कायदा नियम 12 अंतर्गत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे केंद्र सरकारच्या 6 सप्टेंबरच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. एखादा आयएसएस अधिकारी त्या पदासाठी अपात्र असल्याची निश्चिती झाल्यास त्याला त्या पदावरुन दूर करण्याचा अधिकार या नियमानुसार केंद्र सरकारला आहे.
सध्या अंतरिम जामीनावर
खेडकर यांच्यावर खोटी प्रमाणपत्रे मिळविल्याचा आरोप असून त्यांच्यावर या प्रकरणी अभियोगही सादर करण्यात आला आहे. त्या सध्या अंतरिम जामीनावर बाहेर आहेत. त्यांची आयएएसची परीक्षा देण्याची शेवटची संधी 2020 मध्येच संपली होती. तरीही त्यांनी खोटी प्रमाणपत्रे सादर करुन 2021 मध्येही ही परीक्षा दिली होती, असे तपासात आढळून आले आहे. त्यामुळेही कठोर कारवाई करण्यात आली असून आता त्यांचे आयएएस करीअर संपल्यात जमा आहे, असे दिसून येते, अशी प्रतिक्रिया अनेक माजी आयएसएस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.