सागरातील द्वारकेत पंतप्रधानांकडून पूजा
स्कुबा डायव्हिंग करत पोहोचले खोल समुद्रात : ‘दैवी अनुभव’ असल्याचा दावा : देशातील सर्वात लांब ‘सुदर्शन सेतू’चे उद्घाटन
वृत्तसंस्था/ द्वारका, अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरात दौऱ्यादरम्यान बेट द्वारका मंदिरात पूजा केली. यानंतर सर्वात लांब केबल पूल ‘सुदर्शन सेतू’चे उद्घाटन करण्यात आले. यानंतर पंतप्रधानांनी द्वारकेतील पंचकुई बीचवर स्कुबा डायव्हिंगही केले. यादरम्यान खोल समुद्रात जाऊन भगवान श्रीकृष्णाची द्वारका अशी ओळख असलेल्या ठिकाणी पोहोचत पूजा-प्रार्थना केली. स्कुबा डायव्हिंगदरम्यान त्यांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाचे अधिकारी तैनात होते.
द्वारका हे प्राचीन शहर भगवान श्री कृष्णाशी संबंधित असून ते भव्यता आणि समृद्धीचे केंद्र होते. हे समुद्राखालचे एक ठिकाण असून ते आपला समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जतन करते. द्वारकामध्ये साहसी खेळ आणि पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी स्कुबा डायव्हिंगला गेले. पंतप्रधानांनी स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून भगवान कृष्णाशी आपले दृढ नाते उघड केले. ‘आजचा अनुभव आपल्या आयुष्यातील एक दिव्य अनुभव होता’, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान लक्षद्वीपमध्ये स्कुबा डायव्हिंगला गेले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लक्षद्वीपच्या नावलौकिकात बरीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
द्वारकाधीश मंदिरात पूजा
गुजरात दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी प्रथम द्वारकाधीश मंदिरात पूजा केली आणि त्यानंतर सुदामा पूल ओलांडून पंचकुई बीच परिसरात पोहोचले, त्यानंतर पंतप्रधानांनी स्कुबा डायव्हिंगला सुऊवात केली. पंतप्रधानांनी येथे नौदलाच्या जवानांच्या देखरेखीखाली स्कुबा डायव्हिंग केले. स्कुबा डायव्हिंगदरम्यान पौराणिक द्वारका शहराचे समुद्रात बुडालेले अवशेष पंतप्रधान मोदींनी पाहिले. यावेळी नौदलाचे जवान पंतप्रधानांसोबत होते. याशिवाय समुद्राभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.
‘सुदर्शन सेतू’चे उद्घाटन
पंतप्रधान मोदींनी आपल्या गुजरात दौऱ्यादरम्यान देशाला 48 हजार कोटींहून अधिक ऊपयांची विकासकामे भेट दिली. तसेच देशातील सर्वात लांब ‘सुदर्शन सेतू’चे उद्घाटन केले. हा सुदर्शन सेतू 2.3 किमी लांबीचा असून तो ओखा आणि द्वारका बेटाला जोडतो. याची पायाभरणी पंतप्रधानांनी 2017 मध्ये केली होती. जवळपास सहा वर्षांनंतर हा सेतू बांधण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. हा पूल केवळ एक सुविधा नसून तो अभियांत्रिकीचे अप्रतिम उदाहरण आहे. बांधकाम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी येथे येऊन सुदर्शन सेतू पाहावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
अनुभव कथन करताना पंतप्रधान भावुक
द्वारका येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी द्वारका शहराचा दौरा हा अलौकिक अनुभव असल्याचे सांगितले. ‘हा अनुभव मला नेहमी लक्षात राहील. मी आज जे अनुभवले ते नेहमीच माझ्यासोबत राहील. मी समुद्राच्या आत गेलो आणि द्वारका हे प्राचीन शहर पाहिले. मी समुद्राच्या आत देवत्व अनुभवले,’ असे पंतप्रधान पुढे म्हणाले. समुद्रातील द्वारकेमध्ये जाताना मी माझ्यासोबत मोराची पिसे नेली होती. ही मोरपिसे भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केली. तेथे जाऊन द्वारका शहराच्या अवशेषांना स्पर्श करताना मी भावूक झालो. तसेच माझे अनेक दशकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असेही ते पुढे म्हणाले.
विरोधकांवर साधला निशाणा
पंतप्रधान म्हणाले, ‘नव्या भारताच्या उभारणीची हमी मी दिली तेव्हा विरोधकांनी मला शिवीगाळ करून ती नाकारली. आज प्रत्येकजण आपल्या डोळ्यांसमोर नवा भारत घडताना दिसत आहे. देशावर प्रदीर्घ काळ राज्य करणाऱ्यांकडे इच्छाशक्ती नव्हती, त्यांची विचारसरणी फक्त सर्वसामान्यांना सांगायची होती. काँग्रेसने केवळ एकाच कुटुंबाला समृद्ध केले. त्यांची सगळी विचारसरणी केवळ पाच वर्षे सरकार बनवणे आणि घोटाळे लपवणे एवढ्यापुरतीच मर्यादित होती. ज्या अर्थसंकल्पाचा वापर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी व्हायला हवा होता, तो घोटाळ्यांच्या माध्यमातून लुटला गेला. काँग्रेसने टूजी घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, पाणबुडी घोटाळा केला. देशाच्या प्रत्येक गरजांकडे काँग्रेसने पाठ फिरवली, असा हल्लाबोल पंतप्रधानांनी केला.