नव्या ‘एक्स’ फिचरमुळे राजकारणी चिंतेत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगप्रसिद्ध उद्योजग इलॉन मस्क यांच्या ‘एक्स’ या माध्यमाने एक नवे फिचर बाजारात आणले आहे. या फिचरमुळे एखाद्या एक्स खात्याचे लोकेशन नेमके कोठे आहे, हे समजून येते. वास्तविक हे फिचर सर्वसामान्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. मात्र, या फिचरच्या लाँचिंगमुळे भारतातल्या अनेक राजकारण्यांना धडकी भरली असल्याचे वृत्त आहे. भारतातील अनेक राजकारण्यांची एक्स खाती भारताबाहेर आहेत. या राजकारण्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण पसरले आहे.
एका प्रसिद्ध भारतीय वृत्तसंस्थेने या फिचरच्या लाँचिंगनंतर पाहणी केली असता, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांचे खाते अमेरिकेत असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे तर महाराष्ट्र काँग्रेसचे खाते आयर्लंडमध्ये आहे. तसेच नेहमी केंद्र सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्या अनेक राजकारण्यांची आणि तथाकथित विचारवंतांची एक्स खाती भारताबाहेर असून अनेकांची पाकिस्तानातही असल्याचा संशय आहे. अनेकांची खाती दक्षिण आशियात असल्याचे या फिचरमुळे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाने अशा विदेशात खाती काढून त्यावरुन भारत विरोधी आणि हिंदुविरोधी अपप्रचार चालविणाऱ्या राजकारण्यांवर कठोर टीका केली असून या राजकारण्यांच्या हेतूविषयी संशय या पक्षाने व्यक्त केला आहे.