भाजपकडून वक्फ मुद्द्याचा राजकीय वापर
राज्याचे गृहमंत्री परमेश्वर यांची टीका : शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई
बेंगळूर : वक्फचा मुद्दा पुढे करून राज्यात जातीय दंगली घडवून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होत असेल तर तो निर्दयीपणे दडपला जाईल, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी स्पष्ट केले. रविवारी बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजप वक्फच्या मुद्याचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहे. जातीय-दंगली, शांतता नष्ट करण्यासाठी ते काहीही करू शकतात. त्यासाठी ते अभियान राबवत आहेत. शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सहजासहजी सोडणार नाही. त्यावर काय कारवाई होईल याचा अंदाज लावता येत नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला.राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची योजना भाजपने राबवली आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना परमेश्वर यांनी, ते शक्मय नाही.
गृह खात्याने गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था सक्षमपणे हाताळली असून शांतता भंग होणार नाही याची काळजी घेतली आहे. भविष्यात कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. भाजप सरकारच्या विरोधात 40 टक्के कमिशनचा आरोप करून राज्यात काँग्रेस सत्तेत आल्याचा भाजपचा आरोप खोटा आहे. कंत्राटदारांच्या संघटनेचे अध्यक्ष असलेल्या केम्पण्णा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भ्रष्टाचार वाढल्याचे म्हटले आहे. कामांसाठी कमिशन घेत असल्याचे त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे. त्याआधारे भाजप सरकारच्या विरोधात 40 टक्के कमिशनचा आरोप केल्याचे गृहमंत्री परमेश्वर म्हणाले.