केवळ अपात्र बीपीएल रेशनकार्डे रद्द
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे स्पष्टीकरण : गॅरंटींच्या निधीसाठी रेशनकार्डे रद्द करत असल्याचा आरोप फेटाळला
बेंगळूर : राज्यात केवळ अपात्र बीपीएल रेशनकार्ड रद्द केले जात आहेत, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्य सरकार बीपीएल रेशनकार्ड रद्द करत असल्याचा आरोप फेटाळून लावला. राज्यात गॅरंटी योजनांसाठी निधी नसल्यामुळे बीपीएल रेशनकार्डे रद्द केले जात असल्याचा भाजपचा आरोप फेटाळून लावत ते म्हणाले, आम्ही अपात्र बीपीएल रेशनकार्डे परत घेतली आहेत. पात्र रेशनकार्डांची कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, अपात्र असलेल्यांची बीपीएल रेशनकार्ड रद्द करणे गरजेचे आहे.
पात्र कुटुंबांची बीपीएल कार्डे रद्द होत असल्याचे म्हणणे योग्य नाही. अपात्र व्यक्तींना बीपीएल रेशनकार्ड दिले जात नाहीत. तसेच पात्र असलेल्यांना कार्डापासून दूर ठेवू शकत नाही. आयकर भरणारे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना बीपीएल कार्ड द्यायचे का, असा प्रश्न करीत कोणतेही बीपीएल रेशनकार्ड रद्द केले जाणार नाहीत. अपात्रांकडून कार्ड परत घेता येते. याबाबत अन्न खाते तपास करत आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पात्र कुटुंबांचे बीपीएल कार्ड रद्द केले जाणार नाही, याचा पुनऊच्चार त्यांनी केला. जे बीपीएल कार्डसाठी पात्र आहेत ते सुविधांपासून वंचित राहू नये म्हणून अपात्र व्यक्तींची रेशनकार्डे रद्द करण्याचा प्रस्ताव आहे.
सर्वांची कार्डे रद्द होत असल्याचे सांगून भाजप लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. ते खोटे आहे, असा आरोपही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. मागील भाजप सरकार 40 टक्के कमिशनच्या आरोपातून मुक्त झाल्याचे आर. अशोक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, आम्ही कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष केम्पण्णा यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे चौकशी करण्याची सूचना केली होती. पुराव्याअभावी आरोप सिद्ध झाले नाहीत. खुनाच्या गुन्ह्यांमध्येही काही वेळा पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटतात. तेव्हा खून झालाच नाही असे कसे होऊ शकते. खून झालेला असतो पण साक्षीदार साक्ष दिलेले नसतात, असे ते म्हणाले.
बीपीएल कार्ड रद्द काँग्रेसची सहावी गॅरंटी : आर. अशोक
गॅरंटींसाठी पैशाची जुळवाजुळव न करता राज्य सरकार बीपीएल कार्ड रद्द करत आहे. काँग्रेसची ही सहावी गॅरंटी असल्याचा टोला विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी लगावला. बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना, मोफत गॅरंटी देऊ शकत नसल्याने काँग्रेस सरकार आर्थिक अडचणीत सापडले आहे. गॅरंटींसाठी पैशाची जुळवाजुळव करणे अशक्य झाले आहे. त्यासाठी बीपीएल कार्ड रद्द करत आहेत. सुमारे 1 लाख बीपीएल कार्डचे एपीएल कार्डमध्ये रुपांतर झाल्याचा आरोप त्यांनी केला.
गॅरंटींसाठी बीपीएल कार्ड रद्द : प्रल्हाद जोशी
राज्य काँग्रेस सरकार गॅरंटी योजना हाताळण्यास असमर्थ असल्याने बहुतांश बीपीएल कार्डे रद्द करत असेल, असा आरोप केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला. रविवारी हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील सरकारने बीपीएल कार्ड रद्द करत असल्याची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही. गरिबांवर अन्याय हेऊ नये. राज्यातील रेशनकार्डे का रद्द करत आहेत हे मला माहीत नाही. पण, गरिबांवर अन्याय होता कामा नये. याबाबत राज्य सरकारने कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी केली.