For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मातब्बर नेत्यांची फौज, तरीही उमेदवार ठरेना; कोल्हापूरात महायुतीकडून अजूनही चाचपणी

11:38 AM Mar 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
मातब्बर नेत्यांची फौज  तरीही उमेदवार ठरेना  कोल्हापूरात महायुतीकडून अजूनही चाचपणी
Lok Sabha Constituency
Advertisement

श्रीमंत शाहू छत्रपतींच्या उमेदवारीनं वाढवले टेन्शन; विद्यामन खासदार संजय मंडलिक निवडणुक लढवण्यावर ठाम

Advertisement

धीरज बरगे कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील राजकीय परिस्थिती पाहता येथे महायुतीकडे मात्तब्बर नेत्यांची फौजच आहे. मात्र महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू छत्रपतींना दिलेल्या उमेदवारीनं महायुतीचे टेन्शन वाढवलं आहे. मातब्बर नेत्यांची फौज असूनही येथून महायुतीचा उमेदवार ठरेना झाला आहे. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पर्याय शोधण्याची चाचपणी सुरु असली तरी सक्षम असा पर्याय पुढे येताना दिसत नाही. खासदार मंडलिक मात्र कोणत्याही परिस्थितीत निवडणुक लढविण्यावर ठाम असून त्यांनी महायुतीमधील नेत्यांच्या भेटीगाठी घेत मतदार संघात संपर्क दौराही करत कार्यकर्त्यांना चार्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दिल्ली दरबारातून महायुतीची उमेदवारी खासदार मंडलिक यांनाच मिळणार का दूसरा पर्याय देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये झालेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय परिस्थितीच बदलली आहे. या घडामोडीनंतरही कोल्हापूरच्या राजकारणातही मोठे बदल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील चित्र पाहता पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार अमल महाडिक, समरजित घाटगे अशा मातब्बर नेत्यांची फौजच महायुतीकडे आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या करवीर, कागल, राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, गगनबावडा तालुक्यासह पन्हाळ्याच्या काही भागात महायुतीच्या नेत्यांचे वर्चस्व असले, तरी येथून उमेदवार देताना महायुतीची दमछाक होत आहे.

Advertisement

महायुतीला विजयाची गॅरंटी, तरीही उमेदवार ठरेना
लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचा समाजकारण व राजकारणाचा वारसा लाभलेले खासदार संजय मंडलिक यांनी जिल्ह्यातील मंडलिक गट आजही टिकवून ठेवला आहे. त्यामुळे मंडलिक यांना मानणार मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. त्याचबरोबर पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांचा जिल्ह्यात मोठा गट आहे. सोबतील आजी-माजी आमदारही आहेत. या जमेच्या बाजू असतानाही महायुती विजयाच्या गॅरंटीबाबत सावध पाऊल उचलत असल्याचे पहायला मिळत आहे.

कागल तालुक्याकडे लक्ष
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत नेहमीच कागल तालुका केंद्रस्थानी राहिला आहे. पक्ष, गटतट न पाहता कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून कागलचाच खासदार निवडून आला पाहिजे अशी भुमिका येथील जनतेची राहिली आहे. त्याप्रमाणे दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनाही कागलच्या जनतेने नेहमीच पाठबळ दिले आहे. आत्ताच्या निवडणुकीत मंडलिक यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे तालुक्यातील प्रमुख नेते महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही कागल तालुक्यावर विशेष लक्ष असणार आहे.

आमदार सतेज पाटील, पी.एन पाटील यांच्यावर भिस्त
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत असगांवकर हे लोकप्रतिनिधी आहेत. महाविकासचे पाच आमदार असले तरी आमदार सतेज पाटील आणि आमदार पी. एन. पाटील यांच्यावरच महाविकास आघाडीची भिस्त राहणार आहे. महायुतीकडे मात्तब्बर नेत्यांची फौज असली तरी आमदार सतेज पाटील यांनी त्यांचे जिल्ह्यात विस्तृत असे कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. तसेच श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याबद्दलही कोल्हापूरच्या जनतेमध्ये मोठा आदर आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या रणांगणत ‘महायुती’समोर ‘महाविकास’चे कडवे आव्हान असणार आहे.

Advertisement
Tags :

.