For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री गावडेंबाबत राजकीय हालचाली

12:58 PM May 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
मंत्री गावडेंबाबत राजकीय हालचाली
Advertisement

तूर्त गावडे उटीत कार्यकर्त्यांबरोबर : प्रदेशाध्यक्ष नाईक गोव्याच्या बाहेर,राज्यपाल आज पोहोचणार गोव्यात

Advertisement

पणजी : पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यास सांगितल्यानंतर आता राज्यात शांतपणे राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याबाहेर असलेले राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे आज गोव्यात येत आहेत. मंत्री गोविंद गावडे हे उटी येथून 29 रोजी गोव्यात पोहोचतील, असा अंदाज आहे त्यानंतरच गोविंद गावडे यांच्याबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान प्रकाश वेळी यांच्या नेतृत्वाखालील आदिवासी संघटनेच्या सुमारे एक डझन पदाधिकाऱ्यांनी काल मंगळवारी मुख्यमंत्र्यांची सांखळी येथे भेट घेऊन गावडे यांच्यावर कारवाई करू नये, अशी आर्जवी विनंती केली.

आज पाहोचणार राज्यपाल

Advertisement

मुख्यमंत्री सावंत यांच्यावर सत्ताधारी पक्षातून वादग्रस्त मंत्री गोविंद गावडे यांना वगळण्यासाठी जोरदार दबाव आहे. त्यातच पक्षश्रेष्ठींनी गावडे यांना अर्धचंद्र देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे. मुख्यमंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश मान्य करून राज्यपालांना प्रत्यक्ष भेटून कळविण्याचे ठरविले आहे. राज्यपाल पिल्लई हे आज गोव्यात पोहोचणार आहेत.

मंत्री गावडे पोहोचणार उद्या 

सध्या उटी येथे आपल्या कार्यकर्त्यांसह दौऱ्यावर गेलेले मंत्री गोविंद गावडे हे उद्या 29 मे रोजी गोव्यात पोहोचणार आहेत. त्यानंतरच त्यांच्याबाबत निर्णय होईल. मुख्यमंत्री त्यांना भेटीचे निमंत्रण देतील आणि त्यांना स्वखुशीने राजीनामा द्या, असे आदेश देतील. जर त्यांनी राजीनामा दिला नाही, तर राज्यपालांना मुख्यमंत्री लेखी पत्र सादर करतील, जे शिफारस पत्र असणार आहे. त्यामध्ये मंत्री गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याचे कळविले जाईल.

गावडेंचे वादग्रस्त भाषण 

मंत्री गावडे यांनी रविवारी ‘उटा’च्या सभेत जे भाषण केले होते, त्यामधून सरकारची यथेच्च धुलाई केली होती. सरकारवर भ्रष्टाचाराचेही आरोप केले. मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी वारंवार वादग्रस्त निवेदने करणाऱ्या गोविंद गावडे यांना अभय दिले, मात्र आता हद्द झाली, असे निवेदन करून प्रदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सदर मंत्र्याला वगळण्यास सांगितले आहे.

पक्षश्रेष्ठींचा आदेश

मुख्यमंत्र्यांनी पाहूया एवढेच उत्तर दिले होते, मात्र नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री प्रदेश भाजपच्या नेत्यांचे ऐकणार नाही हे लक्षात येऊन खासदार सदानंद शेट तानावडे आणि प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक या दोघांनी पक्षश्रेष्ठींसमोर हा विषय मांडला आणि त्यानुसार सोमवारीच पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांना सदर मंत्र्याला वगळा, असे कळविले आहे.

‘उटा‘ पोहोचली मुख्यमंत्र्यांच्या घरी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मन वळविण्यासाठी काल मंगळवारी त्यांच्या सांखळी येथील निवासस्थानी आदिवासी संघटनेचे काही पदाधिकारी माजी आमदार प्रकाश वेळीप यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यांनी मंत्री गावडे यांना माफ करा, त्यांची काहीही चूक नाही. त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण झालेला आहे. गरज पडल्यास आम्ही देखील गावडे यांना यानंतर असे कोणतेही उद्गार काढू नये, असे कळवू परंतु त्यांच्यावर कारवाई करू नका अशी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले की गेली तीन वर्षे आपण त्यांच्या पाठीशी राहिलो, परंतु आता आपल्या हातात नाही. सारे काही पक्षश्रेष्ठींच्या हाती पोहोचले आहे. मात्र पक्षश्रेष्ठींना सांगून आपण त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नये, अशी विनंती या शिष्टमंडळाने करुन गोविंद गावडे यांची पाठराखण केली.

गोविंद गावडेंवर कारवाई होणारच : नाईक

गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते अजूनही नाशिकमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी काल मंगळवारी बी. एल. संतोष यांच्याबरोबरच्या बैठकीत ऑनलाईन सहभाग घेतला. येत्या 8 जूनपासून देशभरात मोदी सरकारची अकरा वर्षे साजरी करण्याच्या कार्यक्रमासंदर्भातही चर्चा केली. नाईक यांनी सांगितले की आपण 29 मे रोजी गोव्यात येत असून त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. मात्र भाजपच्या धोरणात कोणताही बदल होणार नाही. मंत्री गोविंद गावडे यांच्यावर कडक कारवाई होणारच आहे. दि. 30 मे रोजी मंत्री गावडे यांना चर्चेसाठी बोलाविले जाईल. आम्ही पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करणार आहोत, असेही दामू नाईक म्हणाले.

सरकारमधील भ्रष्टाचाराचा मंत्र्याकडून पर्दाफाश : युरी

मंत्री गोविंद गावडे यांनी नुकत्याच केलेल्या गंभीर आरोपांमधून विद्यमान भाजप सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार माजला असल्याचे सिद्ध झाले आहे. एकप्रकारे हा भ्रष्टाचाराचा पर्दाफाशच आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी टीका केली आहे. भाजपचे मंत्री आणि आमदार भ्रष्टाचारात गुंतले असल्याबद्दल आम्ही वेळोवेळी आरोप केले होते. परंतु कुणीही त्याची दखल घेत नव्हते. आता स्वत: मंत्र्यानेच सरकारला घरचा अहेर दिला आहे. त्यावरून भ्रष्टाचारासंबंधीच्या आमच्या आरोपांवर मोहर लागली आहे. अशावेळी आतातरी भ्रष्टाचारविरोधी पथकाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. आदिवासी समाजासाठी महत्त्वपूर्ण असलेले ‘आदिवासी भवन’ निर्माण करावयाचे सोडून हे सरकार कोट्यावधींचे टॉवर्स उभारण्यात गुंतले आहे. त्याचाच रोष मंत्री गोविंद गावडे यांनी या सरकारवर काढला असून त्यातूनच सरकारातील भ्रष्टाचार जगजाहीर झाला आहे, असा दावा आलेमाव यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.