Sangli Politics : कवठेमहांकाळ तालुक्यात लवकरच राजकीय भूकंप ; समित कदम यांचा गौप्यस्फोट
कवठेमहांकाळ तालुक्यात महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा गट लवकरच प्रवेश
कवठेमहाकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट लवकरच प्रवेश करणार आहे, असा गौप्यस्फोट जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केला. यामुळे तालुक्याच्या राजकारणात धमाका उडेल, असा विश्वासही त्यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.
स्व. आर आर आबा पाटील हे ह्यात असताना येथे मोठे राजकीय केंद्र निर्माण झाले होते. परंतु येथे आता मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपली कवठेमहांकाळ तालुका ही जन्मभूमी असल्याने या तालुक्याचा विकास आणि एक राजकीय केंद्र उभा करण्याचा आपला मानस आहे, असेही समित म्हणाले.
.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यात मोठा राजकीय भूकंप आपण घडविण्याच्या तयारीत आहोत. येथील एक राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट महायुतीमध्ये सामील होणार आहे. म्हणजेच महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिताताई सगरे यांचा गट जनसुराज्य पक्षात सामील होईल, असे स्पष्ट राजकीय संकेत समित कदम यांनी दिले.
सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायत व महानगरपालिका या निवडणुका महायुती मोठ्या ताकदीने लढणार आहे. आणि जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांत महायुतीचीच सत्ता येईल, असा दावा समित कदम यांनी केला.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे शासन आहे. हे शासन समाजातील सर्वच घटकांच्या विकासासाठी काम करीत आहे. जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विकासासाठी सढळ हाताने निधी दिला आहे. त्यामुळे जनता महायुतीच्याच पाठीशी उभी राहील, असा विश्वास समित कदम यांनी व्यक्त केला आहे.
कवठेमहांकाळ तालुका ही आपली जन्मभूमी आहे त्यामुळे या तालुक्याचा विकास करणे हे आपले कर्तव्य असून गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या प्रयत्नातून सुमारे एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी विकासकामांसाठी दिला आहे. आणखी काही निधीही तालुक्याला देवू आणि विकासकामांचा डोंगर उभा करू, अशी हमीही समित कदम यांनी दिली.