For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवरात्रीत राजकीय घडामोडींना वेग

06:43 AM Sep 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
नवरात्रीत राजकीय घडामोडींना वेग
Advertisement

पितृपक्ष नुकताच संपला असून, शारदीय नवरात्र उत्सवाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. गेल्या पंधरा दिवस मंदावलेल्या राजकीय घडामोडींना पुन्हा उत येण्याची शक्यता आहे, मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणूका या शिवसेनेच्या दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेच्या असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2026 अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिल्यानंतर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा नेहमीच महत्त्वाचा समजला जातो. आगामी निवडणूकांच्या दृष्टीने दसरा मेळाव्यात निवडणूकांचे रणशिंग फुंकताना काही मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या गाठीभेटी पाहता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्यास ते विरोधीपक्षाचा सक्षम पर्याय भाजप महायुतीसमोर उभे करू शकतात आणि याचा शहरी भागावर निश्चित परिणाम होऊ शकतो.

Advertisement

पितृपक्ष संपल्यानंतर आता नवरात्री उत्सवाला सुरूवात झाली आहे, भक्ती श्रध्दा आणि उत्साहाबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका बघता राजकीय खेळींना ऊत येणार आहे. मुंबई, ठाणे महापालिका निवडणूका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीने लिटमस टेस्ट ठरणार आहेत. भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांना आपले अस्तित्व दाखवण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होतील. तर राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या महापालिकांच्या निवडणूका जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काहीही झाले तरी या सर्व निवडणूका जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

Advertisement

या निवडणूका लक्षात घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे, एकीकडे उध्दव ठाकरे यांनी शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांच्याशी बैठका सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. त्यात सर्वाधिक चर्चा आहे ती, ठाकरे बंधू एकत्र येण्याची. सध्या ठाकरे बंधू कौटुंबिक कार्यक्रमांना एकत्र येताना दिसत आहेत, मात्र राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची घोषणा होण्याची बाकी आहे. मुंबई महापालिकेचा विचार करायचा झाला तर, आजपर्यंत शिवसेना उध्दव ठाकरेंकडे असलेली मुंबई महापालिका ही कोणत्याही परिस्थितीत भाजपला स्वत:कडे घ्यायची आहे. त्यादृष्टीने भाजपने मुंबईत विजय संकल्प मेळावा घेत आपली भूमिका व रणनिती दोन्ही स्पष्ट केल्या. भाजपला मुंबई महापालिकेत स्वत:चा महापौर बसवायचा आहे, मात्र भाजपने विजय संकल्प मेळाव्यात सावध भूमिका घेत मुंबई महापालिकेचा पुढील महापौर हा महायुतीचा होणार असल्याचे सांगितले. शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिंदे गटासोबत असलेल्या नगरसेवकांची बैठक घेताना, त्यांना विश्वास देताना मुंबई महापालिकेवर महायुतीचीच सत्ता येणार असल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदे गटातील काही नगरसेवक ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईतील ज्या मतदार संघात मराठी मतदार हे निर्णायक आहेत, तेथील सत्तासमीकरणे निश्चितच बदलणार आहेत. शिंदे गटासाठी मुंबई आणि ठाण्यातील आपली ताकद दाखविण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे, मुंबईत शिंदे गटाला उध्दव ठाकरे यांचे आव्हान असणार आहे. तर ठाण्यात ऑपरेशन लोटस हे शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरणार आहे. मुंबईत उध्दव ठाकरे यांचे स्वत:चे असे उपद्रव्य मुल्य आहे, ते त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दाखवले. मुंबईत उध्दव ठाकरेंबरोबरच भाजपची स्वत:ची अशी व्होटबँक आहे, गेल्या काही निवडणूकामंध्ये भाजपने युती कऊन सत्ता मिळवली असली तरी, कार्यकर्त्यामंध्ये आणि नेतृत्वामध्ये स्वबळावर लढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजपने सत्तेच्या माध्यमातून संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची फौज, शिवाय केंद्रातील आणि राज्यातील सत्तेचा पक्ष वाढीसाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी केलेला वापर बघता, भाजपला स्बवळावर लढण्यासाठीचा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांची सगळी मदार ही मराठी मतदारांवर असणार आहे. त्यात राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र आल्यास शिंदेंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची भूमिका सध्या तरी भाजपविरोधी असल्याचे दिसत आहे. मुंबई पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर राज ठाकरे यांनी शहा पिता-पुत्र यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे ओढले. मात्र राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रावर म्हणावे तसे प्रत्युत्तर भाजप किंवा शिंदे गटाकडून देण्यात आले नाही.

राष्ट्रवादी अजित पवार गटाने नागपूर येथे झालेल्या पक्षाच्या चिंतन शिबिरात युती किंवा आघाडीबाबत पक्ष कोणत्याही भूमिकेसाठी आग्रही नसल्याचे स्पष्ट केले, मात्र मुंबईत महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचे सांगितले. महायुतीतल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मुंबईत दरारा नाही. त्यामुळे त्यांना कितीही जागा मिळाल्या तरी ते समाधानी राहणार आहेत. त्यामुळे महायुतीत भाजप आणि शिंदे सेनेत जागा मिळविण्यासाठी मोठी चुरस लागणार आहे. तर महाविकास आघाडीचे चित्र हे अद्याप निश्चित व्हायचे

आहे. मनसेला सामावून घेतल्यास काँग्रेस महाविकास आघाडीत राहील का, हा प्रश्न आहे. तर राज ठाकरे यांचा मनसे पक्षाच्या निर्मितीनंतरचा राजकीय प्रवास पाहिला तर, मनसेने कोणाशीच निवडणूकपूर्व युती न करता स्वत:च्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यावर भर दिला आहे. उध्दव ठाकरे आधीपासूनच  शरद पवारांच्या जवळ आहेत, जर राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र आले आणि शरद पवारांनी त्यांना साथ दिली तर भाजप-शिंदे युतीला मोठे आव्हान प्रादेशिक पक्षांच्या महाविकास आघाडीचे असणार आहे. पण भाजपला रोखण्यासाठी ही महाआघाडी तयार होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.