पुढील चार दिवस राजकीय जोडण्यांचे ! पाटील आणि घाटगे यांनी केले शरद पवारांचे स्वागत पवार बुधवारपर्यंत मुक्काम
कोल्हापूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे चार दिवसांच्या कोल्हापूर द्रौयासाठी सोमवारी दुपारी दोन वाजता आगमन झाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तीन नेत्यांमध्ये बंद खोलीत पंधरा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर पवार एका कार्यक्रमासाठी बेळगावकडे रवाना झाले. पुढील चार दिवस कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय जोडण्या होणार असल्याने पवार यांच्या दौरा लक्षवेधी ठरत आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा यावेळचा दौरा समरजितसिंह घाटगे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानिमित्ताने गाजत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ या आपल्या एकवेळच्या शार्गिदच्या विरोधात वस्तादाने डाव टाकत घाटगे यांच्या हाती राष्ट्रवादीची तुतारी देण्याच्या जोडण्या घातल्या आहेत. मंगळवारी संध्याकाळी कागल येथील गौबी चौकात समरजित घाटगे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश होत आहे. गौबी चौकात शरद पवार यांची सभा होणार असून या सभेत पवार यांची तोफ धडाडणार असल्याने राज्याचे लक्ष याकडे लागले आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारपासून गुरूवारपर्यंत शरद पवार कोल्हापुरात मुक्कामी असून विविध राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवणार आहेत. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शरद पवार यांचे कोल्हापुरात आगमन झाले.
हॉटेल पंचशील जवळच शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील पोलीस व्हॅन बंद पडली. अचानक पवार यांच्या वाहनांना ताफा थांबल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. बंद व्हॅन तिथेच थांबवून बाजूने पवार यांच्या ताफ्यातील इतर वाहनांना पुढे मार्ग रिकामा करुन देण्यात आला. पवार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आले होते. आमदार सतेज पाटील, समरजितसिंह घाटगे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून शरद पवार यांचे स्वागत केले. यानंतर पवार यांनी खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, समरजितसिंह घाटगे यांच्यासमवेत बंद खोलीत दहा मिनिटे चर्चा केली. चर्चेचा तपशील समजला नसला तरी गौबी चौकात होण्राया कागल येथील सभेच्या नियोजनाबाबत चर्चा झाल्याचे समजते. यानंतर शरद पवार बेळगाव येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले. रात्री दहा वाजता त्यांचे कोल्हापुरात आगमन झाले. दरम्यान, मंगळवारी दहा वाजता संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यागृहाची पाहणी शरद पवार करणार आहेत. सायंकाळी गौबी चौकात जाहीर सभा होणार आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता भारत पाटणकर यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम आहे. तर दुपारी चार वाजता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे. गुरूवारी सकाळी सांगली जिह्यातील आटपाडी येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत.