राजकीय स्पर्धा, लांगेबांधे आणि इर्षेची शक्तिपीठाला शक्ती
कोल्हापूर / संतोष पाटील :
गोव्यापासून नागपूरपर्यंतच्या तिर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या राज्यभरातील 12 जिह्यांमधून जाणारा 802 किलोमिटरचा शक्तिपीठ महामार्गावरुन कोल्हापुरातील राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात पुन्हा तापणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील शक्तिपीठाच्या विरोधात आहेत. तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ व्हावे यासाठी उघडपणे व्यासपीठ निर्माण करत पाठिंबा दिला आहे. राजकीय इर्षा-लांगेबांधे-स्पर्धा यांची किनार असलेल्या शक्तिपीठाच्या विरोधात आणि समर्थनामुळे जिह्याचे राजकारण मात्र येत्या काळात तापणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडीया आघाडीने शक्तीपीठ महामार्गावरुन राज्यभर आंदोलनाची राळ उडवली होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जमिनींचे अधिग्रहण थांबवण्यास तात्पूर्ती स्थगिती दिली. राज्यभरात शक्तीपीठ महामार्गासाठी लागणाऱ्या 27 हजार हेक्टर जमिनीचे अधिग्रहण शेतक्रयांना विश्वासात घेतल्याशिवाय केले जाणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय तत्कालीन शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत 20 जून 2024 रोजी घेण्यात आला.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यातील राजकारण शक्तीपीठ मार्गावरुन इंडीया आघाडी आक्रमक झाली होती. शक्तीपीठ मार्ग रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापुरात खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली 18 जून 2024 रोजी मंगळवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. विशेष म्हणजे महायुतीचे जेष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवत मोर्चात सहभाग नोंदवला होता. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सत्ताधारी आघाडी बोलण्याचे टाळत होते. महामार्ग होणार किंवा नाही याला स्पष्ट उत्तर न देता बायपास केले जात होते. मात्र. यथावकाश, विधानसभा निवडणुकीत इंडीया आघाडीचे पानिपत झाले. महाविकास आघाडी कोल्हापू जिह्यासह राज्यात राजकीय दृष्ट्या ताकदवान ठरली. महामार्गासह इतर मुद्यावर आंदोलनासाठी लागणार ताकद विरोधी आघाडीत संपल्यासारखीच स्थिती निर्माण झाली. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीकडून महामार्ग होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले.
महामार्गावरुन महायुती आणि महाविकास आघाडीत यांच्यात समर्थन आणि विरोधासाठी राळ उडणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ हे विरोधात तर आमदार राजेश क्षीरसागर समर्थनाच्या बाजूने आहेत. सतेज पाटील विरोधी आघाडीची बाजू सांभळत असताना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठिंब्याने त्यांना या मुद्द्यावर बळ मिळणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक महामार्गाचा आपला अजेंडा पुढे रेटत असतानाच आपला मतदार विचलित होऊ नये यासाठी जिह्यातही राजकीय नेत्यांची विभागणी होणार आहे.
- काय आहे आहे शक्तिपीठ महामार्ग?
2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तिपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. सहा पदरी असणारा हा महामार्ग राज्यातील वर्धा, नांदेड, परभणी, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे हा 802 किमी लांबीचा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडणारा आहे. सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने 18 तास लागतात, मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासांवर येणार आहे. राज्यातील तीन शक्तिपीठांना हा महामार्ग जोडणार असल्याने या महामार्गाला ‘शक्तिपीठ’ महामार्ग असे देण्यात आले आहे. राज्यातील सर्वात लांब हा सुपर एक्स्प्रेसवे असेल. हा महामार्ग वर्धा जिह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग येथे संपेल. यालाच नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग म्हणजेच शक्तीपीठ द्रुतगती मार्ग म्हणून ओळखले जाते, हा महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा आणि सहा-लेन प्रवेश-नियंत्रित द्रुतगती मार्ग आहे, हा महामार्ग नागपूर तसेच गोवा राज्यांना जोडला जाणार असून तो महाराष्ट्रातील 12 आणि गोव्यातील एका जिह्यातून जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी राज्य सरकार 86 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. 2025 मध्ये या महामार्गाचे भूमिपूजन होणार असून 2030 मध्ये तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
- या तिर्थक्षेत्रांना जोडणारा मार्ग
शक्तिपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा माहामार्ग जोडला जाणार आहे. याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर, पट्टणकोडोली, कणेरी, आदमापूर तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार आहे.