महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2024 ची राजकीय बाराखडी

06:58 AM Dec 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

येणारे वर्ष हे फार वेगळे असणार आहे. महाराष्ट्रात भाजपने जी जबर मुसंडी मारली आहे त्याने दिल्लीत अरविंद केजरीवाल हे सावध झालेले आहेत. पुढील दोन महिन्यात होत असलेल्या दिल्लीतील विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बाजी मारून जाणार काय? या भीतीने त्यांना सतावले आहे. येत्या वर्षात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष होणारे डोनाल्ड ट्रम्प काय विक्षिप्तपणा करणार या भीतीने भारतासह अमेरिकेचे बरेच मित्र देश तसेच शत्रुदेश सावध झालेले आहेत. ट्रम्प हे लवकरच चीन आणि रशिया या घनिष्ठ मित्रात भांडण लावून देणार आणि त्याचे परिणाम जगभर होणार असे सांगितले जात आहे.

Advertisement

अदानी मुद्दा अजून अजिबात संपलेला नाही. तो काय नवीन वळणे घेणार त्यावर बरेच काही ठरणार आहे. अदानी यांचे औद्योगिक साम्राज्य हे परदेशात देखील पसरले असल्याने तिथे काय घटना घडतील त्यावर वारे वाहणार आहे. कोणी काहीही म्हणो, पण अदानी ही मोदींच्या गळ्यातील धोंड आहे हे दिवसेंदिवस जास्त स्पष्ट होत आहे. कोणी कितीही विश्वामित्री पवित्रा घेतला तरी जर कधी अदानी बोलू लागला अथवा त्यावर गंडांतर आले तर त्याचे राजकीय परिणाम देखील होणार आहेत. हे केवळ विरोधकच बोलत नसून सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारखे भाजपमधील असंतुष्ट देखील बोलत आहेत. जर सारे काही सहीसलामत राहिले तर मात्र वर्षात वा त्यानंतर विरोधकांना खिंडीत पकडण्यासाठी मध्यावधी निवडणुकीचा जुगार मोदी खेळू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालेली आहे. अशावेळीच इंडिया आघाडीत नेतृत्वाच्या प्रश्नावर जो कलगीतुरा सुरु झाला आहे तो निश्चितच चिंतेचा विषय आहे. राहुल गांधी यांनी अदानी प्रश्नावर जी जहाल लाईन घेतलेली आहे ती प्रादेशिक पक्षांना झेपणारी नाही. 2024 ची छाया नवीन वर्षावर पडल्याशिवाय राहणार नाही.

Advertisement

इंडिया आघाडीत सुरु झालेल्या कलगीतुऱ्याचा योग्य अर्थ लावून जर राहुल गांधी कामाला लागले तर ते अघोषित पद्धतीने ‘एकला चालो रे’ मार्ग नवीन वर्षात अवलंबू शकतात. काँग्रेसने स्वबळावर उभे राहण्याचा खराखुरा प्रयत्न केला तर राजकारण फारच वेगळे होणार आहे. तसे त्यांनी केले नाही तर ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ असे वरचेवर त्यांना मित्रपक्षांकडून सांगितले जाणार आहे.  मोदी आपला कोठेही कसाही गेम करू शकतात या भीतीनेच काँग्रेसचे मित्रपक्ष राहुलना लक्ष्य करत भाजपधार्जिणे राजकारण करतात हे मानायला वाव आहे. अजब चीज आहे. ‘मोदीनंतर कोण?’ या विषयावर विचित्र कुजबुज जाणाऱ्या वर्षात सुरु झालेली आहे तर दुसरीकडे ‘कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे?’ असा वरकरणी तरी पंतप्रधानांचा पवित्रा दिसत आहे. सत्य कोठे मध्येच दडलेले आहे. दिल्ली विधानसभेत भाजपचा झेंडा बुलंद राहणार अथवा नाही त्यावर नवीन वर्षातील राजकीय वातावरण कसे राहणार हे ठरणार आहे. केजरीवाल हे शर्थीने लढत आहेत पण आयत्यावेळी मोदी काय डाव टाकणार यावर खेळ पालटणार असे बोलले जात आहे.

दिल्लीतील लढाई एकतर्फी राहिलेली नाही. गेले दशकभर आपल्याला केजरीवाल यांच्या हातून पराभव पत्करावा लागला याची सल पंतप्रधानांच्या मनात आहे. काँग्रेसला मिरच्या झोंबवण्यासाठी अखिलेश यादव यांनी केजरीवाल यांच्या पक्षाचा प्रचार दिल्लीत सुरु केलेला आहे. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस वेगळी लढत आहे आणि त्यामुळे केजरीवाल यांची गोची होऊ शकते असे मानले जात आहे. जाणारे वर्ष राजकीयदृष्टया एक मोठा साप शिडीचाच खेळ होते. त्याने होत्याचे नव्हते केले आणि नव्हत्याचे होते. कोण कधी सापाच्या तोंडून खाली घसरला आणि कोण शिडीवरून चटकन वर चढला कळलेच नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर खाली घसरलेले नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुकीनंतर वरती चढले तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे पार घसरले. जणू वाटले की लोक त्यांना विसरले. 2024 मध्ये सरतेशेवटी महाराष्ट्र भाजपचा ‘कोहिनूर’ ठरला. हरयाणातील विजयाने भाजपला मजबूती दिली तर महाराष्ट्रामुळे त्याला स्वर्ग दोन बोटे उरला आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसादिवशी अजित पवार यांचे कुटुंबासह त्यांची भेट घेणे ही केवळ कौटुंबिक बाब मानता येत नाही. त्यामुळे येत्या वर्षात महाराष्ट्रात बरीच पडझड होणार आहे. एकनाथ शिंदे यांचा हळूहळू ‘उद्धव ठाकरे’ बनवण्याच्या खेळी देखील लवकरच सुरु होतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ‘घी देखा मगर बडगा नही देखा’ असे मानण्याला वाव आहे. कोणाही मित्रपक्षाला ‘मी शूर शिपाई आहे’ असे म्हणणे घातक आहे. अजित पवार यांनी भाजपधार्जिणी लाईन घेत शिंदेंची कोंडी केलेली आहे. भाजपच्या दोन्ही हातात लाडू आहेत. उत्तरप्रदेशात विधानसभेच्या पोटनिवडणुकांत भाजपने भरघोस यश मिळवून योगी आदित्यनाथ यांचे नाणे अजून खणखणीत आहे असे दाखवले आहे. नुकतेच लखनौमध्ये एक मोठे आंदोलन करण्याचा काँग्रेसने घेतलेला निर्णय म्हणजे स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी त्याने सुरु केली आहे असे मानले जात आहे. अखिलेश यादव त्यामुळे नाराज झालेले आहेत.

मनमोहनसिंह पर्व समाप्त:

2025 चा उदय होत असतानाच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. 2004 ते 2014 या दहा वर्षात त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने एका नवीन पद्धतीचं राजकारण पाहिले. एका नोकरशहाला नेता बनवून सोनिया गांधी यांनी सत्ता मिळवली खरी पण तिने काँग्रेसचे किती भले झाले हे एक प्रश्नचिन्ह राहिले आहे. नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय स्तरावर उदय हे काँग्रेसच्या अपयशाचे प्रतीक आहे.

बेळगावमध्ये विचारमंथन करून काँग्रेसची दशा आणि दिशा कितपत बदलणार हे येत्या काळात दिसणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीत नेतृत्वाच्या प्रश्नावर सुरू झालेला कलगीतुरा हा काँग्रेसला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे. अरविंद केजरीवाल यांचा पक्ष तर काँग्रेसला विरोधी आघाडीतून काढण्याची भाषा करायला लागला आहे याचा अर्थ त्याच्या पायाखालची वाळू दिल्लीत सरकत आहे असा होतो. आंबेडकर यांच्या अपमान प्रकरणी विरोधी पक्षांचे ऐक्य निर्माण करून भाजपने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. राष्ट्रीय नेत्यांत केवळ डॉक्टर आंबेडकर यांचा अपमान हा संबंधित राजकीय पक्षावर जास्त उततो असे स्वातंत्र्योत्तर काळात बघण्यात आलेले आहे. संघ प्रमुख मोहन भागवत यांनी गेल्या आठवड्यात अयोध्या प्रश्नावर जे विधान केलेले आहे त्याने वादळ माजलेले आहे. अयोध्या आंदोलनाशी जुडलेले बरेच संत महंत हे मशिदींच्या येथे उत्खनन करण्याबाबत आक्रमक असल्याने या विषयावर नवीन वर्षात वाद माजला नाही तरच नवल ठरेल. नवीन वर्ष साजरं करण्यात एक विघ्न मात्र आले आहे. ग्रामीण भागात आलेल्या मंदीमुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री देखील कमी झाली आहे. त्याने उद्योग जगत चिंताग्रस्त झाले आहे. सीआयआय या त्यांच्या संघटनेने गरीब वर्गाला ग्राहक कूपन सरकारने पुढील वर्षी वाटावी व त्यातून काही जीवनावश्यक वस्तू त्यांना मोफत उपलब्ध करून द्याव्यात. तसेच रोजगार हमी योजनेखाली मजुरीचे दर 33 टक्क्यांनी वाढवावेत. पीएम किसान योजनेअंतर्गत अजून जास्त रक्कम शेतकरी वर्गाला द्यावी अशी सूचना केली आहे.

तात्पर्य काय तर राजकीय क्षेत्रप्रमाणे आर्थिक क्षेत्रात देखील उद्रेकाची स्थिती आहे. ती कशी हाताळली जाते त्यावर बरेच काही अवलंबून आहे. दिसते तसे नसते म्हणून जग फसते असे म्हणतात. नवीन वर्षात कोणाची फसण्याची पाळी आहे? घोडामैदान जवळच आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article