पोलीस पतीची पत्नीला शेडमध्ये कोंडून जबर मारहाण
विजापूर जिल्ह्यातील तिकोटामधील घटना
बेळगाव : तिकोटा, जि. विजापूर येथील एका पोलिसाने आपल्या पत्नीला शेडमध्ये कोंडून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. कसेबसे पतीच्या तावडीतून सुटका करून घेतलेल्या महिलेने महिला सांत्वन केंद्राच्या मदतीने बेळगाव गाठले आहे. प्रतिमा यल्लाप्पा अगसगे (वय 37) असे तिचे नाव आहे. तिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रतिमा मूळची रायबाग तालुक्यातील निडगुंदीची. अथणी तालुक्यातील कुन्नाळ येथील यल्लाप्पा अगसगे या पोलिसाबरोबर दहा वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले आहे. या दाम्पत्याला तीन मुलेही आहेत. सध्या यल्लाप्पा तिकोटा पोलीस स्थानकात सेवा बजावतो आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला एका शेडमध्ये कोंडून घातल्याचा आरोप पत्नीने केला आहे. शेडमध्ये तिला चटकेही देण्यात आले आहेत. शनिवारी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांची भेट घेऊन यासंबंधी तक्रार करणार असल्याचे प्रतिमाने सांगितले. चित्रपट अभिनेता दर्शनने रेणुकास्वामी या आपल्याच चाहत्याला शेडमध्ये कोंडून त्याचा खून केल्याची घटना ताजी असतानाच विजापूर जिल्ह्यात पतीने पत्नीला कोंडल्याची घटना घडली आहे.