विनयभंग प्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित
कोल्हापूर :
रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने जखमी मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली होती. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या चेतन दिलीप घाटगे याला शुक्रवारी पोलीस दलातून निलंबीत करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी दिली. दरम्यान गुरुवारी रात्री गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच चेतन घाटगे याने शाहूपुरी पोलीस ठाण्यातूनच पलायन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका अल्पवयीन तरुणीने हात कापून घेतल्याची घटना बुधवारी घडली होती. त्या तरुणीचा जबाब घेण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक पदावर कार्यरत असणारे चेतन घाटगे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दवाखान्याच्या अतिदक्षता विभागात गेले होते. जबाब घेत असताना घाटगे यांनी त्या तरुणीस स्वत:चा वैयक्तीक मोबाईल नंबर देत, तु माझी मैत्रीण आहेस घाबरु नकोस, काही अडचण असल्यास मला फोन कर असे सांगत तिची छेड काढली. तसेच तिच्या अंगाला स्पर्श करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन त्या तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा चेतन घाटगेवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलाम 75 (1 ), 1, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलाम 8, 10, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे होता.
गुरुवारी दिवसभर चेतन घाटगे शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर होता. गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच घाटगेने पोलीस ठाण्यातून पलायन केले होते. शुक्रवारी दिवसभर चेतन घाटगेचा शोध घेण्याचे काम सुरु होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी गुरुवार रात्री पासूनच त्याचा शोध घेत होते. चेतन घाटगे याचा मोबाईल बंद असल्यामुळे पोलिसांनी घाटगेच्या नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही.
- घाटगेचे तात्काळ निलंबन
चेतन घाटगे याच्यावर दाखल झालेला गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. याची दखल तात्काळ पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी घेतली. यानुसार घाटगेचा शोध घेवून अटक करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी रात्री अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी घाटगेला निलंबीत केले.