पोलिसांना मिळणार नवीन 250 घरे..!
गडहिंग्लज, राधानगरी, शाहूवाडी, जयसिंगपूर येथे नव्या सदनिकांना मंजुरी
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी 250 नवीन सदनिका मंजूर झाल्या आहेत. गडहिंग्लज, राधानगरी, शाहूवाडी, जयसिंगपूर येथे नवीन सदनिकांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. पोलीस दलाकडून लवकरच याबाबतची निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
पोलिसांना चांगली घरे मिळावीत, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सात-आठ वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार पोलीस मुख्यालयासह जुना बुधवार पेठ, लक्ष्मीपुरी आणि इचलकरंजीतील कलानगर, पोलीस मुख्यालय येथे एकूण 677 नव्या घरांना मंजुरी मिळाली. मात्र, हे गृह प्रकल्प कागदावरच राहिले होते. तत्कालीन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी यातील त्रुटी दूर करुन या कामांना सुरुवात केली. गतवर्षी जुना बुधवार पेठ पोलीस लाईन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. तसेच पोलीस मुख्यालय आणि लक्ष्मीपुरीतील कामांना सुरुवात झाली आहे. या चारही ठिकाणी कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच हे प्रकल्प पुर्णत्वास येणार आहेत. या सर्व सदनिका वर्ग 2 च्या असून त्यांचा आकार 538 स्वेअर फुट आहे. नव्याने प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या 250 सदनिकाही वर्ग 2 च्या असून 538 स्केअर फुटांच्या आहेत.
गडहिंग्लज, राधानगरी, शाहूवाडी, जयसिंगपूर येथे नवीन 250 सदनिकांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्याच्या निधीबाबत गृह विभागाकडे पाठपुरावा सुरु असून लवकरच हा निधी मिळणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. शाहूवाडी, गडहिंग्लज, राधानगरी येथे कामाच्या ठिकाणी पोलिसांना वेळी अवेळी ये-जा करावी लागते. या सदनिकांमुळे पोलिसांचा प्रवासाचा त्रास कमी होणार आहे. जवळपास 250 कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी राहण्याची चांगली व्यवस्था निर्माण झाल्यामुळे अधिक कार्यक्षमतेने व तत्परतेने पोलीस काम करु शकतात.
प्रतिक्रिया
गडहिंग्लज, राधानगरी, शाहूवाडी, जयसिंगपूर येथे सदनिकांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. निधीबाबत पाठपुरावा सुरु आहे. निधी प्राप्त होताच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. या सदनिकांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्याच्या ठिकाणी चांगली राहण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
महेंद्र पंडीत, पोलीस अधिक्षक
नव्याने मंजूर झालेल्या सदनिका
गडहिंग्लज - 124
राधानगरी - 49
शाहूवाडी - 43
जयसिंगपूर - 34
एकूण - 250
सध्या सुरु असलेली बांधकामे
जुना बुधवार पेठ : 167
पोलीस मुख्यालय : 204
लक्ष्मीपुरी : 96
इचलकरंजी : 210