कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला मिळणार गती; 2023 अखेर कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा
कोल्हापूर प्रतिनिधी
बहुचर्चित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. बुधवारी गोवा येथे कोकण रेल्वेच्या झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. या रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादित शेतीमाल बंदरापर्यंत पोहचण्यास तर कोकणातील खनिजासह अन्य मालाची पश्चिम महाराष्ट्रात वाहतूक करणे सुलभ आणि किफायतशीर होऊन कोकण व पश्चि महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र रेल्वे मार्गाने कोकणला जोडला जावा अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने या रेल्वे मार्गाचा तीन वेळा सर्व्हे झाला. पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. फेब्रुवारी 2017 च्या अर्थसंकल्पात रेल्वेने जाहीर केलेल्या पिंकबुकमध्ये 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. रेल्वे आणि राज्य शासनाच्या निधीतून हा प्रकल्प करण्यात येणार होता. या रेल्वे मार्गाचा डीपीआर करुन तो 7 मे 2017 रोजी रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते 11 जून 2017 रोजी कराड येथे या मार्गाचे भूमिपूजन झाले. पण त्यानंतर रेल्वे बोर्डाने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याने सव्वा सात वर्षात तो पुढे सरकला नाही.
दरम्यान, बुधवारी गोवा येथे कोकण रेल्वेची बैठक होऊन कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत सकारात्मक चर्चा झाली. सद्या या प्रकल्पाच्या प्रस्तावाची अंमलबजावणी रेल्वे मंत्रालयाच्या मध्य रेल्वे विभागाकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. त्यानुसार कोकण रेल्वेने कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग प्रकल्प मध्य रेल्वेकडे हस्तांतरित केला आहे. या मार्गातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून प्रकल्प अंमलबजावणीच्या टप्यावर आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला फायदा
सद्या पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते.तर कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. हे अंतर जास्त आणि खर्चिकही आहे.कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे.तर कोकणातील मालही मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे. यामुळे या रेल्वे मार्गाची नितांत गरज आहे.
जुलै अखेर मार्ग स्पष्ट होणार
कोल्हापूर -वैभववाडी रेल्वे मार्गासाठी तीन सर्व्हे करण्यात आले.मात्र बुधवारी झालेल्या बैठकीत कोणत्या सर्व्हेनुसार प्रकल्प करण्यात येणार आहे हे स्पष्ट करण्यात आले नाही.जुलै अखेर बैठक होणार असून त्यावेळी कोणता मार्ग हे कळणार आहे.
प्रकल्प असा-
कोल्हापूर- वैभववाडी
अंतर -108 किलोमीटर
बोगदे- 27
स्टेशन- 10-
प्रकल्प किंमत- 3500 कोटी
प्रस्तावित जमीन- 683 हेक्टर