शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर पोलिसांकडून कारवाई
बेळगाव : अवजड वाहनांमुळे शाळकरी मुलांचे बळी जात असल्याने सकाळी 7 ते 11 पर्यंत आणि सायंकाळी 4 ते 8 पर्यंत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी आहे. तरीदेखील या आदेशाचे उल्लंघन करत शहरात अवजड वाहने प्रवेश करत आहेत. त्यामुळे मंगळवारी दक्षिण रहदारी पोलिसांकडून विविध ठिकाणी थांबून अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. खानापूर आणि गोव्याहून येणारी अवजड वाहने सुसाट वेगाने शहरात प्रवेश करीत आहेत. त्याचबरोबर पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून येणारी वाहनेदेखील चन्नम्मा सर्कल मार्गे शहरात येत आहेत.
अशा अवजड वाहनांमुळे यापूर्वी अनेक शाळकरी मुलांचे बळी गेले आहेत. त्यामुळे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्याने तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील यांनी शहरात अवजड वाहनांना सकाळी आणि सायंकाळी मर्यादित काळासाठी प्रवेशबंदी केली होती. मात्र मध्यंतरी या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. त्यामुळे अवजड वाहनांमुळे पुन्हा शाळकरी मुलांना जीव गमवावा लागला. त्यानंतर पुन्हा वाहतूक पोलिसांनी पिरनवाडी नाक्यावर अवजड वाहने रोखण्यास सुरुवात केली आहे.
सकाळी 7 ते 11 पर्यंत वाहने रोखून धरली जातात. 11 नंतर खानापूर आणि गोव्याकडून येणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश दिला जातो. तर उत्तर रहदारी पोलिसांकडून केएलईनजीक अवजड वाहनांना रोखले जाते. त्यानंतर सायंकाळी 4 वा. रोखलेली वाहने रात्री 8 वाजता सोडली जातात. रात्रीच्यावेळी साहित्य ने-आण करण्यासाठी उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत आलेली अवजड वाहने आदेशाचे उल्लंघन करत शहरातून रेटली जात आहेत. त्यामुळे अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मंगळवारी दक्षिण वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी थांबून अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात होती.