महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांचे शक्तिप्रदर्शन

11:30 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पूर्वी सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती : साडेतीन हजारांहून अधिक बळ

Advertisement

बेळगाव : मंगळवारी होणाऱ्या श्री विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी पोलीस दलाने मिरवणूक मार्गावर शक्तिप्रदर्शन केले. बंदोबस्तासाठी विविध जिल्ह्यातून आलेले पोलीस बेळगावात दाखल झाले असून सुमारे साडेतीन हजारहून अधिक बळ मागविण्यात आले आहे. रविवारी त्यांचे पथसंचलन झाले. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग,उपायुक्त रोहन जगदीश आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या पथसंचलनात केवळ बेळगाव शहरच नव्हे तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून बंदोबस्तासाठी आलेले अधिकारी व पोलीस सहभागी झाले होते. कमांडो पथकानेही मिरवणूक मार्गावर शक्तिप्रदर्शन केले. याआधीही वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात पथसंचलन करून पोलीस दलाने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.खासकरून संवेदनशील भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून या परिसरात अतिरिक्त सीसीटीव्हींचे कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.

Advertisement

रविवारी सायंकाळी सरदार्स हायस्कूल मैदानापासून पथसंचलनाला सुरुवात झाली. यासाठी पोलीस व परिवहन मंडळाच्या बसमधून पोलिसांना आणण्यात आले होते. राणी कित्तूर चन्नम्मा चौक, काकतीवेस, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक मार्गे कपिलेश्वर तलावापर्यंत जाऊन पथसंचलनाचा समारोप झाला. बंदोबस्तासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या अधिकारी व पोलिसांना मिरवणूक मार्गाची माहिती व्हावी, नागरिकांच्या मनात पोलीस दलाबद्दल एक विश्वास निर्माण व्हावा, यासाठी पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव पोलिसांनी मिरवणूक बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली असून कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती कोठे करावी? हे निश्चित झाले आहे. बंदोबस्तासाठी याआधी बेळगावात सेवा बजावलेल्या व सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.

नागमंगल घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

पाच दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी मंड्या जिल्ह्यातील नागमंगल येथे दंगल उसळली होती. बुधवार दि. 11 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा झालेल्या दंगलीत जाळपोळ, लुटालूट, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. दंगलखोरांनी परिस्थितीचा फायदा घेत वाहनांची चोरीही केली आहे. नागमंगल घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने खबरदारी घेतली आहे.

समाजमाध्यमांवरही पोलिसांनी बारकाईने लक्ष 

जातीय सलोख्याला धक्का पोहोचविणारे संदेश समाजमाध्यमांवर फिरविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. असे संदेश फॉरवर्ड करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. समाजमाध्यमांवरही पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article