सीडी फॅक्टरीचा पोलिसांनी शोध घ्यावा
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
हनीट्रॅप प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याची गरज नाही. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसच त्याची चौकशी करतात. यामागचा सूत्रधार कोण आहे, तो बाहेर आला पाहिजे. सीडी फॅक्टरी कोठे आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
शनिवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना बहुचर्चित हनीट्रॅप प्रकरणी मंत्री के. एन. राजण्णा यांनी तक्रार दिल्यास त्याची चौकशी होते. तक्रार दाखल करण्यासाठी आणखी अवधी आहे. डरकाळ्या फोडणाऱ्या वाघांनाच हनीट्रॅपमध्ये अडकविण्यात येत आहे. त्यांनाच टार्गेट केले जात आहे. राजण्णा यांना तक्रार देण्यासाठी आपणच सांगितले आहे. कायदेतज्ञांशी चर्चा करून त्यांनी तक्रार द्यायला हवी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
कन्नड संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदसंदर्भात बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, बंद किंवा आंदोलन हे काही पहिल्यांदाच झाले नाही. आंदोलन करण्याचा त्यांना हक्क आहे. त्याच्यामुळे शाळा-कॉलेज, इस्पितळ, व्यापारावर परिणाम होऊ नये. गेल्या तीस वर्षांपूर्वीचा भाषिक संघर्ष आता नाही, असे सांगतानाच म. ए. समितीवर बंदी घालून उपयोग होणार नाही. बंदी घातली तर अन्य नावाने या संघटना पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाजपचे आमदार मुनिरत्न यांनी थेट डी. के. शिवकुमार यांच्यावर हनीट्रॅप प्रकरणी आरोप केले आहेत. म्हणून आम्ही करता येणार नाही. चौकशी होऊ द्या. हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकलेले 40 किंवा 400 जणही असू शकतात. चौकशी झाल्यानंतरच ते उघड होणार आहे. यावेळी जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष विनय नावलगट्टी, सुनील हणमण्णावर, सिद्दीक अंकलगी, राजा सलीम आदी उपस्थित होते.
