For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी नगरसेवकाच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताचा घातपात

11:48 AM Jan 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
माजी नगरसेवकाच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताचा घातपात
Advertisement

कुटुंबीयांचा आरोप : अपघाती मृत्यूला वेगळे वळण : आठ जणांवर गुन्हा दाखल : तिघे रायबाग पोलिसांच्या ताब्यात

Advertisement

वार्ताहर/कुडची

मिरज येथील माजी नगरसेवकाच्या खुनाच्या गुह्यातील संशयिताच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे. ठार झालेल्या संशयिताच्या कुटुंबांनी दिलेल्या तक्रारीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यातील तिघांना रायबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा अपघात नसून खून असल्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. रायबाग तालुक्यातील कंचकरवाडी येथे मंगळवारी हा अपघात झाला होता. त्यामध्ये समीर खाजा शेख (वय 32), मूळ रा. ईदगाहनगर, मिरज, सध्या रा. रायबाग हा मोटारसायकलस्वार ठार झाला होता. तर त्याचा मित्र फिरोज मुस्ताक रोहिले (वय 24) रा. ईदगाहनगर, मिरज हा जखमी आहे. शेखच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून रायबाग पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळवून मोटारसायकलचा मोटारीने पाठलाग करून खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनाही आहे. त्यासाठी पोलिसांनी आठपैकी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

Advertisement

मिरज येथील माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांचा 2017 मध्ये खून झाला होता. या खून प्रकरणात सात संशयितांवर गुन्हा दाखल झाला होता. यातील सहा जणांना न्यायालयातून जामीन मिळाला होता. तर समीर याला न्यायालयाने जामीन रद्द करत मिरज तालुका बंदी करत तडीपार केले होते. त्यामुळे समीर हा रायबाग येथे चार महिन्यांपासून राहायला आला होता. मंगळवारी सांगली येथील न्यायालयात हजर होण्यासाठी तो मोटारसायकलवरून मित्र रोहिले यांच्यासोबत जात होता. यड्राव-अंकली रस्त्यावर कंचकरवाडीजवळ मोटारसायकल व मोटारीच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे खाली पडले. यावेळी दवाखान्याला नेताना समीर याचा मृत्यू झाला तर रोहिले याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, समीर याचा अपघात नसून खून असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबाने केली आहे. त्यानुसार या अपघाताच्या घटनेतून खुनाची घटना उघडकीस येण्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात मोटारसायकलचा पाठलाग केलेली मोटार व अपघातग्रस्त मोटारसायकल पोलीस ठाण्यात आणली आहे. त्यामुळे मिरज येथील खुनाचे पडसाद रायबागमध्ये अपघात भासवून खून करण्यापर्यंत गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मिरजला पोलिसांचे पथक गेले असून आणखी काही संशयितांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून याबाबत लवकरच उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.