आयएसआय विरोधात पोलिसांची निदर्शने
पाकिस्तानातील स्फोटात सैन्याच्या भूमिकेबद्दल संशय वाढला ः 100 हून अधिक पोलिसांच्या मृत्यूने संताप
वृत्तसंस्था/ पेशावर
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील सैन्याच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. याचदरम्यान खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पोलिसांनी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या विरोधात आंदोलन केले आहे. या पोलिसांनी आयएसआयच्या विरोधात घोषणाबाजी करत गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गणवेश परिधान करून आणि शस्त्रास्त्रs हातात घेत पहिल्यांदाच पोलिसांनी पाकिस्तानातील शक्तिशाली आयएसआयच्या विरोधात निदर्शने केली आहेत. अशाप्रकारची प्रदर्शने अनेक जिल्हय़ांमध्ये झाली आहेत. पेशावर पोलीस मुख्यालयातील मशिदीत झालेल्या स्फोटात 100 हून अधिक पोलीस कर्मचारी ठार झाले होते. या हल्ल्यामागे आयएसआयचा हात असल्याचे बोलले जात आहे. याचमुळे संतप्त पोलीस कर्मचाऱयांनी आयएसआयच्या विरोधात निदर्शने कली आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तान सरकार आणि विरोधी पक्षादरम्यान आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांनी तालिबानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप केला आहे. तसेच शरीफ यांनी हिंसेचे खापर मागील इम्रान खान सरकारवर फोडले आहे, पंतप्रधानपदी असताना इम्रान यांनी तालिबानी दहशतवाद्यांदान मदत करत त्यांच्याशी वाटाघाटी केल्याचा आरोप शरीफ यांच्याकडून करण्यात आला आहे. सरकार दहशतवादाच्या नावावर सार्वत्रिक निवडणू टाळू पाहत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.
आयएसआयचे माजी प्रमुख स्फोटासाठी जबाबदार
मानवाधिकार संघटनांनंतर सत्तारुढ पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज)च्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी आत्मघाती हल्ल्यासाठी आयएसआयचे माजी प्रमुख जनरल फैज हमीद जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. जनरल हमीद यांना इम्रान खान यांचे डोळे, हात आणि कान म्हटले जात होते. हमीद यांनी दहशतवाद्यांसाठी (अफगाणिस्तानातून) पाकिस्तानचे दार का खुले केले? कट्टरवादी दहशतवाद्यांची मुक्तता का केली असे प्रश्नार्थक विधान मरियम यांनी केले आहे.
लाखो पोलीस अधिकारी देणार राजीनामा
खैबर पख्तूनख्वा पोलीस विभागाचा मेमो समोर आला आहे. यात मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा योग्यप्रकारे तपास करण्यात न आल्यास आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यात न आल्यास 300 हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीनामा देतील. याचबरोबर कनिष्ठ स्तरारील 1 लाख कर्मचारीही राजीनामा देणार असल्याचे या मेमोत नमूद आहे.
पोलिसाच्या वेशात आला होता हल्लेखोर
खैबर पख्तूनख्वा पोलिसांना आत्मघाती हल्ल्यावरून मोठी माहिती प्राप्त झाली आहे. हल्लेखोर पोलिसाच्या वेशात मशिदीत शिरला होता असे पोलीस प्रमुखांनी सांगितले आहे. आत्मघाती स्फोटासाठी 10-12 किलो टीएनटी वापरण्यात आल्याचा संशय आहे.
माजी गृहमंत्र्याला अटक
पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद यांना अटक करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यावर इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी माजी मंत्री फवाद चौधरी यांना अटक करण्यात आली होती. चौधरी यांना आता जामीन मंजूर झाला आहे.