मध्यरात्रीपर्यंत पोलिसांचे दबावतंत्र
मार्ग बदलासाठी म. ए. समिती नेत्यांना वेठीस धरण्याचे सत्र
प्रतिनिधी/ बेळगाव
काळादिन फेरीच्या मार्गात बदल करावा, यासाठी शुक्रवारी मध्यरात्री 1 पर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना वेठीस धरण्यात आले. मार्गात बदल करा अन्यथा गुन्हे दाखल करू, असा दबाव पोलिसांकडून घालण्यात येत होता. परंतु, म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मराठीबाणा दाखवत किती गुन्हे घालायचे तितके घाला, परंतु पारंपरिक मार्गाने शहरातून फेरी निघणारच, असा पवित्रा घेतला. महाराष्ट्र एकीकरण समितीने तब्बल महिनाभर आधी पोलीस, तसेच जिल्हा प्रशासनाला परवानगीसाठीचे पत्र दिले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी चर्चा करण्यासाठी बोलावूनही घेतले. परंतु, परवानगीबाबतचा निर्णय होऊ शकला नव्हता. शुक्रवारी रात्री 9 वाजल्यानंतर पोलिसांची हालचाल सुरू झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांच्यासह अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पोलिसांची फोनाफोनी सुरू झाली.
शहरात राज्योत्सव मिरवणूक असल्याने शनिमंदिरच्या पुढे सायकल फेरी काढू नये यासाठी पोलिसांचा दबाव होता. अद्याप म. ए. समितीला सायकल फेरीसाठी परवानगी देण्यात आली नसून नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. परंतु, आम्ही अर्ज करून महिना झाला आणि शेवटच्याक्षणी याबाबत चर्चा होत असल्याने पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. तसेच जे
होईल ते शनिवारी सायकल फेरीवेळी पाहिले जाईल, असे सांगताच पोलिसांनी फोन करणे बंद केले. परंतु, रात्री 1 वाजेपर्यंत पोलिसांकडून मन:स्ताप सुरूच होता.
म. ए. समितीने फेरी यशस्वी करून दाखविली...
शनिवारी सकाळी धर्मवीर संभाजी उद्यान येथे कार्यकर्ते जमू नयेत यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. परंतु, कार्यकर्त्यांची संख्या वाढल्याने पोलिसांना नमते घ्यावे लागले. तसेच उद्यान परिसरातील बॅरिकेड्स हटवावे लागले. अशाच प्रकारची दडपशाही फेरीदरम्यानही पाहायला मिळाली. परंतु, महाराष्ट्र एकीकरण समितीने आपली फेरी यशस्वी करून दाखविली.