For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकार पुरस्कृत तपासकामासाठी अटक करण्याचा पोलिसांचा डाव

06:01 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
सरकार पुरस्कृत तपासकामासाठी अटक करण्याचा पोलिसांचा डाव
Advertisement

आगरवाडेकर घर प्रकरणी पूजा शर्माचा न्यायालयात खळबळजनक दावा

Advertisement

पणजी: खास प्रतिनिधी

आसगाव येथील आगरवाडेकर यांचे घर पाडल्याच्या प्रकरणात सरकार पुरस्कृत तपासकामासाठी पोलिसांचे आपल्याला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा खळबळजनक दावा मुख्य संशयित आरोपी पूजा शर्मा हिने वकील अॅड. सुरेंद्र देसाई यांच्यामार्फत केला. या प्रकरणी आमदार लोबो दांपत्य आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप केल्याने तपासकाम स्वतंत्र होत नसल्याचे उघड झाल्याने, आपले अशील पूजा शर्मा हिला अटकपूर्व जामीन द्यावा, अशी मागणीही त्यांनी पणजी प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या. इर्शाद आगा यांच्याकडे केली. यावर पुढील सुनावणी सोमवारी (8 जुलै )होणार आहे.

Advertisement

पूजा शर्मा हिला अटकपूर्व जामीन देण्यास विरोध करून क्राईम ब्रांचने सादर केलेल्या उत्तराला सतत दुसऱ्या दिवशी शनिवारी प्रत्युत्तर देण्यासाठी शर्मा हिचे वकील अॅड. सुरेंद्र देसाई यांनी युक्तिवाद सुरू केला. ज्या दिवशी आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर पाडण्यात आले, त्या दिवशी स्थानिक आमदार डिलायला लोबो यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी, कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि स्वत: मुख्यमंत्री सावंत यांनी घराची पाहणी करून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आणि सरकारतर्फे आगरवाडेकर कुटुंबीयांना घर बांधून देऊ, त्याचा खर्च ज्यांनी घर मोडले त्यांच्याकडून वसूल करण्याचे जाहीर केले. या प्रकरणात तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याचा अर्थ, पोलीस तपासकामात सरकारचा थेट हस्तक्षेप होत असून परिस्थितीवर सरकारी यंत्रणेचे नियंत्रण असल्याचे उघड होत आहे. या एकाच कारणामुळे शर्मा यांना पोलीस अटक करू शकत नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे देसाई यांनी न्यायालयापुढे नमूद केले.

शर्मा हिने 2020 साली आसगावची जागा मूळ मालक पिंटो यांच्याकडून खरेदी केली असून सेलडीडही करण्यात आले आहे. आगरवाडेकर जर या जागेचे मालक असेल तर त्यांनी कायदेशीर कागदपत्रे दाखवावी. सदर जमीन खरेदी केली त्यावेळी सेसडीडमध्ये या जागी मोडकळीस आलेले आणि जुने घर असल्याचे नमूद करण्यात आले असून त्यावेळी आगरवाडेकर त्या घरात राहत सुद्धा नव्हते. आपण या जमिनीची कायदेशीर मालक असून तेथे कोणी बळजबरीने घुसला असेल तर त्याला जुन्या मालकाने काढण्याची जबाबदारी इस्टेट एजन्ट अर्शद ख्वाजा याला देण्यात आली का, याचा पोलिसांनी तपास करावा. पूजा शर्मा ही घर पाडण्यावेळी तर सोडाच, 2024 मध्ये अजूनही गोव्यात आलेली नाही. सदरचे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असून त्याला गुन्हेगारी खटल्याचे पोलिसांनी रूपांतर केले असल्याचा आरोप देसाई यांनी केला.

पूजा शर्मा हिच्या बाजूने देसाई यांनी युक्तिवाद शनिवारी पूर्ण केला. पोलिसांच्यावतीने युक्तिवाद आता सोमवारी होणाऱ्या सुनावणीवेळी केला जाईल, असे न्या. आगा यांनी सांगून सुनावणी तात्पुरती तहकूब केली.

 पोलीस तपासकामातील त्रुटी केल्या उघड

हणजूण पोलिसांकडून एक आणि क्राईम ब्रांचने पाठवलेले दोन समन्स आपल्याला अजूनही मिळालेले नाही. याकडे लक्ष वेधताना आपण घरी नसताना समन्स सादर करण्यात आले असल्याचे देसाई यांनी पूजा शर्माच्यावतीने सांगितले. उलट आपण दोनवेळा गोव्यात पोचू शकत नसल्याचे स्पष्ट करून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तारीख देण्याच्या विनंतीला पोलिसांनी काहीही उत्तर दिलेले नाही. पूजा शर्मा हिने न्यायालयात 1 जुलै रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असतानाही क्राईम ब्रांचने तिसरे समन्स पाठवले आहे. आता पोलीस तीन समन्स पाठवूनही पूजा शर्मा तपासकामात सहकार्य करत नसल्याचा आरोप करत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या उत्तरात या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, उत्तरात पूजा शर्मा फरार असून अटक चुकविण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ पोलीस चौकशीच्या नावाखाली आपल्याला अटक करू पाहत असल्याचे उघड होत आहे. यात, सदरचे समन्स फौजदारी कायद्याच्या कलम- 41 (अ) खाली पाठवण्यात आले असून या कलमाखालील गुन्हा गंभीर नसल्याचे कायदा सांगत असल्याचे देसाई यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :

.