परूळे बाजारपेठ अचानक बंद करण्याचे पोलिसांचे आदेश
व्यापारी आक्रमक
परूळे/ प्रतिनिधी
मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत असलेली परूळे बाजारपेठ अचानक बंद करण्याचे आदेश निवती पोलिसांनी दिल्याने व्यापारी आक्रमक झाले. तर दूध व्यवसायिक, हॉटेल व्यावसायिक , पेपर विक्रेते यांचे मोठे नुकसान शासनाच्या हलगर्जीपणामुळे दुकानदारांना सहन करावे लागले . आज बुधवारी २० रोजी मतदान कालावधीमध्ये मतदान केंद्र परिसरातील सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश ग्रामपंचायतला 19 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा प्राप्त झाले. मात्र त्याची कल्पना येथील व्यापाऱ्यांना देण्यात आली नाही . त्यामुळे नेहमीप्रमाणे व्यापाऱ्यांनी दूध ,हॉटेल, भट्टी व्यावसायिक यांनी पाव आदी साहित्याची मोठ्या प्रमाणात जमवाजमाव केली होती. मात्र अचानक बाजारपेठ बंद करण्याचे आदेश सकाळी पोलिसांनी दिल्याने नाशवंत वस्तू फेकून देण्याची वेळ व्यावसायिकांवर आली. यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले . आजवरच्या इतिहासात अनेक निवडणुका झाल्या . मात्र निवडणुकी दरम्यान बाजारपेठ बंद करण्याची वेळ व्यावसायिकांवर कधी आली नव्हती . केवळ शासनाच्या हलगर्जीपणामुळे व्यावसायिकांना नुकसान सोसावे लागले आणि व्यावसायिक आक्रमक झाले अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांनी जाब विचारला मात्र अधिकाऱ्यांनी टोलवाटोलची उत्तरे देऊन अखेर बाजारपेठ बंद ठेवण्यास भाग पाडले. यावर व्यावसायिक यांनी आक्रमक भूमिका घेत भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये व्यावसायिकांचा विचार करावा. अन्यथा मतदान केंद्र दुसरीकडे न्यावे अशी मागणी करण्यात आली . अन्यथा दोन दिवस अगोदर कल्पना प्रशासनाने द्यावी अशीही मागणी करण्यात आली.