For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन दरोडेखोरांवर पोलिसांकडून गोळीबार

11:06 AM Apr 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
दोन दरोडेखोरांवर पोलिसांकडून गोळीबार
Advertisement

दरोडेखोरांकडून पोलिसांवरही दगड-बियरच्या बाटल्यांनी हल्ला : पोलीस अधिकाऱ्यांसह चौघे जखमी

Advertisement

कारवार : केरळमधील कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीतील दोन दरोडेखोरांनी पोलिसांवर दगड आणि बियरच्या बाटल्यांनी हल्ला चढविला. पोलिसांनी संरक्षणासाठी दरोडेखोरांच्या पायावर गोळीबार करून जायबंदी केले. दरोडेखोरांच्या हल्ल्यात मुंदगोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक परशुराम मिरजगी, अंकोला पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उदप्पा देरप्पनवर, पोलीस कर्मचारी बसवराज आणि अन्य एक कर्मचारी जखमी झाला. पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या दरोडेखोरांची नावे तल्लत आणि नवपाल (दोघेही रा. मंगळूर) अशी आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी हल्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भागवतीजवळ घडली. जखमी पोलीस आणि दरोडेखोरांना उपचारासाठी हल्याळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी पोलीस आणि दरोडेखोरांच्या जीवावरील धोका टळला आहे. कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एस. नारायण यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. नारायण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि त्यानंतर रुग्णालयाला भेट देऊन जखमी पोलिसांची विचारपूस केली.

या प्रकरणाबद्दल कारवार जिल्हा पोलीस प्रमुख एस. नारायण यांनी दिलेली अधिक माहिती अशी, 28 जानेवारी 2025 रोजी अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुबळी-अंकोला राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वरील रामनगुळी येथे एक कार आढळून आली होती. बराच वेळ कारजवळ कोणीच फिरकले नसल्याने ती कार अंकोला पोलीस ठाण्यात ओढून नेण्यात आली. तेथे कारची तपासणी केली असता 1 कोटी 15 लाख रुपये इतकी रक्कम आढळून आली होती. पहिल्यांदा त्या कारवर आणि आढळून आलेल्या रकमेवर कोणीच मालकीचा दावा केला नव्हता. त्यामुळे पोलीस खात्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. तथापि आठवड्यानंतर मंगळूर येथील राजेंद्र नावाच्या ज्वेलरी व्यापाऱ्याने ती कार आणि रक्कम आपली असल्याचा दावा केला होता. बेळगाव येथे सोन्याची विक्री करून मिळालेली रक्कम अंकोला येथील रियल इस्टेटवाल्याला देण्यासाठी जात असलेल्या आपल्या दोन ड्रायव्हरना अडवून रक्कम पळविल्याची तक्रार राजेंद्र यांनी केली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख जगदीश आणि कारवारचे डीएसपी गिरीश यांच्या नेतृत्वाखाली खास पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून या प्रकरणाचा कसून शोध घेण्यात येत होता. दरम्यान दरोड्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन कार यल्लापूर येथे आढळून आल्या होत्या. प्रकरणाची कसून तपासणी केली असता या प्रकरणामागे केरळमधील कुख्यात दरोडेखोरांची टोळी असल्याचे स्पष्ट झाले होते. टोळीत 12 ते 13 दरोडेखोर कार्यरत असून त्या घटनेनंतर दरोडेखोरांनी रक्कम वाटून घेतली व ते बेंगळूर, मुंबई, दिल्ली येथे निघून गेले. तीन ते चार दरोडेखोरांनी अन्य देश गाठले आहेत.

Advertisement

पोलिसांवर केला हल्ला

चौकशीसाठी तल्लत आणि नवपाल या दरोडेखोरांना अंकोल्याला नेत असताना त्यांनी मूत्रविसर्जनासाठी विनंती केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांवर दगड आणि बियरच्या बाटल्यांनी हल्ला चढविला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी संरक्षणासाठी दरोडेखोरांवर गोळीबार करून जायबंदी केले आहे. टोळीत समावेश असलेले दरोडेखोर राऊडी शिटर असून रामनगुळी येथील काही दरोडेखोरांनी आपल्या कुटुंबीयांना दिल्ली, मुंबई येथे नेऊन ठेवले आहे. दरोड्यानंतर त्यांनी मोबाईलचा वापर बंद केला आहे. इतकेच नव्हे तर ते आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कातही नाहीत, असे कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एस. नारायण यांनी सांगितले.

बेळगावजवळ दोघा दरोडेखोरांना घेतले ताब्यात

पोलिसांवर गोळीबार केलेल्या या दोन दरोडेखोरांचा बांद्रा (मुंबई) येथील समुद्रकिनाऱ्यावर वावर दिसून आला होता. पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवून होते. पुन्हा त्यांचा ठावठिकाणा लागला आणि  बेळगावजवळ त्यांना ताब्यात घेण्यात आले, असे कारवार जिल्हा पोलीस प्रमुख एस. नारायण यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.