For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : उमरगा येथे पोलीस अॅक्शन मोडवर ; अतिक्रमणधारकांवर कारवाई

06:06 PM Oct 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
solapur news   उमरगा येथे पोलीस अॅक्शन मोडवर   अतिक्रमणधारकांवर कारवाई
Advertisement

                                   अतिक्रमण विरोधात कारवाई चालू केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त

Advertisement

उमरगा : शहरातील महामार्गाच्या दुतर्फा बसणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. लक्ष्मण रेषा आखून देत अतिक्रमणविरोधी कारवाईस सुरूवात केली आहे. शनिवारी शहरातील बसस्थानकासमोरच्या फळ, बडापाव, भाजी विक्रेत्यांना पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी नोटिसा बजावल्या. पोलिसांचा फौजफाटा घेऊन अतिक्रमण विरोधात कारवाई चालू केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

लावण्यात आलेले हातगाडे, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, पान टपरी, चप्पल दुकान, आंब्याची विक्री करणारे, आईस्क्रीम आदी दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने रस्त्यावर वाहन थांबवावे लागत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. अतिक्रमणधारक रस्त्यावर बसून राजरोसपणे व्यवसाय थाटत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाल्याने अनेक अपघात झाले होते.

Advertisement

बसस्थानकातून बस मार्गस्थ करीत असताना थांबलेल्या वाहनांमुळे अनेकवेळा वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली होती. शहरातील बसस्थानक परिसर आणि आरोग्य कॉर्नर येथे बसलेल्या भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणाने वाहतुकीची कोंडी कायम होत होती.

ही वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. यात पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र चाटे, आय.एस. पठाण, पी.. नळेगावकर, व्ही.एस. माणकोळे, एस.बी. वाघमारे, एस.आय. समुद्रे आदी पोलिसांनी भाग घेतला होता. पोलिसांच्यावतीने रस्त्यावर विक्रीसाठी बसणाऱ्या व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत.

अतिक्रमण वाढण्यास कोणाचा आशीर्वाद

व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, खाद्यपदार्थ स्टॉलधारकांनी मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात, इंदिरा चौकात, मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. पूर्वी रस्त्यावर विक्रेत्यांचे टेम्पो थांबत नसत. आता मात्र, हातगाड्यांच्या तुलनेत विशेषतः रविवारी टेम्पोची मोठी संख्या पहायला मिळते. नगरपालिकेत नगरसेवक नसताना आणि प्रशासक राज असताना अतिक्रमणे वाढण्यामागे कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

Advertisement
Tags :

.