For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : गुंडांकडून पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण

12:33 PM Oct 15, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   गुंडांकडून पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण
Advertisement

                          रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यास विरोध केल्याने पोलिसाला मारहाण

Advertisement

कोल्हापूर : लक्षतीर्थ बसाहत येथे रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यापासून रोखल्याने तिघा सराईत गुंडांनी पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत मारहाण केली. कॉलर पकडून शिवीगाळ केली. सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लक्षतीर्थ बसाहत येथील शाहू चौकात ही घटना घडली.

या प्रकरणी सादीक मोहम्मद पाटणकर (वय २०), अवधुत पिराजी गजगेश्वर (वय १९), आदित्य राहुल भोजणे (वय २२, सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत) यांच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल पंढरीनाथ सामंत हे दोन वर्षापासून लक्ष्मीपुरी येथे कर्तव्यास आहेत.

Advertisement

सोमवारी रात्री त्यांना नाईट ड्युटी होती. पंढरीनाथ सामंत व पोलीस कॉन्स्टेबल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन पेट्रोलिंग करत लक्षतीर्थ वसाहत येथे गेले होते. यावेळी तीन तरुण रस्त्यावर उभे राहून आरडाओरडा करत असल्याचे दिसून आले. पंढरीनाथ सामंत यांनी जवळ जाऊन पाहिले असता, ते तिघे रस्त्याच्या मधोमध दुचाकीवर केक ठेवून वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसून आले. सामंत यांनी या तिघांना नावे विचारली. यावेळी सामंत यांनी तुम्हाला रस्त्यावर वाढदिवस साजरा करता येणार नाही, येथून निघून जावा असे सांगितले. तिघा संशयितांनी यास नकार देत आम्ही येथेच वाढदिवस साजरा करणार असे धमकावले.

यामुळे पंढरीनाथ सामंत यांनी या तिघांचे मोबाईलमध्ये शुटींग करण्यास सुरुवात केली. यावेळी तिघेजण सामंत यांच्या अंगावर धावून गेले. या तिघांनी सामंत यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. सामंत यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनी पकडून एकाने त्यांना मारहाण करत ढकलून दिले. याचवेळी कोळी यांनी दुचाकीवरुन उतरुन या तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र हे तिघे पसार झाले. पंढरीनाथ सामंत यांच्या हाता, पायास दुखापत झाली.

दरम्यान या घटनेची माहिती रात्रगस्तीचे पोलीस उपनिरीक्षक खरात, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जाधव यांना देण्यात आली. त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र हे तिघे पसार झाले. दरम्यान सामंत यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी पहाटे तिघा संशयितांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, पोलीस कर्मचाऱ्यास मारहण करणे या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तिघेही सराईत गुंड

सादीक पाटणकर, अबधुत गजगेश्वर, आदित्य भोजणे हे तिघेही २० ते २२ वयोगटातील आहेत. मात्र या तिघांवर लक्ष्मीपुरी, राजवाडा येथे मारामारीसह खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. या तिघांची परिसरात दहशत असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागज्रक करत आहेत.

Advertisement
Tags :

.