साळगाव दुहेरी खून प्रकरणी पोलिस गोव्याबाहेर रवाना
म्हापसा : साळगाव येथे घरमालक रिचर्ड व भाडेकरू अभिषेक गुप्ता यांच्या दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागू शकले नाही. घरमालकाची स्कूटर घेऊन संशयित रेल्वेतून पसार झाल्याचे उघडकीस आले असले तरी पोलिस संशयित आरोपीचा कसून शोध घेत आहे. त्याच्या शोधात एक पोलिस पथक गोव्याबाहेर पाठविण्यात आले आहे. घरमालकांनी खोल्या भाड्याने देण्यापूर्वी पडताळणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
पोलिस महानिरीक्षक केशव राम चौरासिया यांच्यासह उत्तर गोवा पोलिस उपअधीक्षक विश्वेश कर्पे, पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिस आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेत आहेत. तसेच मोबाईल कॉल रिकॉर्ड व स्थानिक साक्षीदारांच्या माहितीवरून तपासाचे धागेदोरे मिळविण्यास प्रयत्न सुरू आहेत. पण नेमका हा दुहेरी खून का झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
जेथे खून झाला त्याठिकाणाहून पोलिसांनी दाऊच्या बाटल्या व इतर वस्तू तसेच चाकू हस्तगत केला आहे. प्राथमिक तपासात दोघांचाही मृत्यू मध्यरात्रीपासून पहाटेच्या सुमारास झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग तसेच हातापाई झाल्याचे चिन्ह आढळल्याने हा खून नियोजन पद्धतीने केल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. अभिषेक गुप्ता याने जगन्नाथ याला बुधवारी गोव्यात आणल्याचे उघडकीस आले असून त्याला पाहण्यासाठी रिचर्ड रात्री खोलीत आला होता. या दोघांनी एकत्रित दारू पिल्याचे आढळून आले असून फरारी जगन्नाथ याचा पोलिस शोध घेत आहेत.
मयत रिचर्ड डिमेलोवर शवचिकित्सा
मयत रिचर्ड डिमेलो यांच्यावर बांबोळी येथे शवचिकित्सा शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. डोक्याला मार लागल्याने आणि गळा चिरल्यामुळे रिचर्ड यांना मरण आल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. अभिषेक गुप्ता याचा खून झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून त्याचे कुटुंबीय गोव्यात आल्यावर त्याच्यावर शवचिकित्सा करण्यात येणार आहे. साळगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी पोलिस पथक अधिक तपास करीत आहे.