अनंतपूरच्या कुटुंबावर पोलिसांची नजर
बेळगाव : वादग्रस्त संत रामपाल बाबांच्या प्रभावाखाली येऊन सदेह वैकुंठाला जाण्याची तयारी करणाऱ्या अनंतपूर, ता. अथणी येथील कुटुंबीयांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. त्यांच्याघराजवळ एक पोलीस तैनात करण्यात आला असून त्या कुटुंबीयांनीही आपला निर्णय बदलला आहे. अनंतपूर येथील शिंगणापूर रोडवर असलेल्या शेतवडीत राहणाऱ्या तुकाराम इरकर, त्यांची पत्नी, मुलगा व सून या एकाच कुटुंबातील चौघा जणांसह 21 जणांनी सदेह वैकुंठाला जाण्याची तयारी ठेवली होती. यासाठी संत रामपाल बाबांचा वाढदिवस असलेल्या 8 सप्टेंबरचा मुहूर्तही ठरवण्यात आला होता. त्याच दिवशी बाबा आपल्याकडे येणार व आपल्याला सदेह वैकुंठाला घेऊन जाणार, या भावनेतच हे कुटुंबीय वावरत होते. चिकोडीचे प्रांताधिकारी सुभाष संपगावी, अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुनवळ्ळी, कौलगुडचे श्री अमरेश्वर महाराज आदींनी केलेल्या मनपरिवर्तनामुळे सदेह वैपुंठाच्या कल्पनेतून हे कुटुंबीय बाहेर पडले आहे
मात्र, संत रामपाल बाबांची प्रार्थना व आराधना त्यांनी सुरूच ठेवली आहे. अघटित घडू नये यासाठी या कुटुंबीयांच्या घराजवळच पोलीस तैनात करण्यात आले आहे. तालुका आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. बसनगौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील वैद्यकीय पथकाने घरातील चौघा जणांची आरोग्य तपासणी केली आहे. सध्या त्यांची मन:स्थिती ठीक आहे. सदेह वैकुंठाला जाण्याच्या विचारातून हळूहळू ते बाहेर पडत आहेत. मात्र, त्यांची नित्य प्रार्थना त्यांनी सुरू ठेवली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे व उत्तरप्रदेशमधील पाच जणांना अनंतपूरमधून त्यांच्या गावी परत पाठविण्यात आले आहे. 8 सप्टेंबर रोजी रामपाल बाबांचा वाढदिवस आहे. त्या दिवशी धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सदेह वैकुंठाला जाण्याच्या विचाराने सर्व कुटुंबीय उत्सुक होते. यासाठीच विजापूर, पुणे, मुंबई, उत्तरप्रदेशमधील बाबांचे अनुयायी अनंतपूरकडे येत होते. कोणालाही बोलावू नये, अशी सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केली असून या कुटुंबीयांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यात आले आहेत.