कोगनोळी महामार्गावर पोलीस बंदोबस्त
महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी
वार्ताहर/कोगनोळी
कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे सोमवार 8 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील दूधगंगा नदीवरील पुलावर महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अधिवेशनाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी कर्नाटक पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून नेतेमंडळी तसेच कार्यकर्ते कर्नाटकात प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक वाहनांची बारकाईने तपासणी सुरू आहे.
सीमेवरील प्रवेशद्वारावर बॅरिगेड्स उभारण्यात आले असून पोलिसांकडून वाहनांची कागदपत्रे, ओळखपत्र तसेच वाहतूक नियमांचे पालन याची तपासणी केली जात आहे. संशयास्पद वाहनांवर विशेष लक्ष ठेवले जात असून अनधिकृत साहित्य किंवा बेकायदा वस्तूंची वाहतूक होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. तपासणी दरम्यान वाहनचालकांना सहकार्य करण्याचे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चिकोडीचे डीवायएसपी गोपाळकृष्ण गौडर व निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार शिवराज नाईकवाडी यांच्या देखरेखीखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अधिवेशन संपेपर्यंत ही सुरक्षा व्यवस्था कायम राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली.