For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगाव परिसरात चोख पोलीस बंदोबस्त

11:37 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
उचगाव परिसरात चोख पोलीस बंदोबस्त
Advertisement

काही विघ्नसंतोषी संघटनांकडून भाषिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नावरून दखल

Advertisement

वार्ताहर/उचगाव

उचगाव येथे काही विघ्नसंतोषी संघटनांकडून भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र पोलीस खात्याने गावातील शांतता व सुव्यवस्थेला धक्का पोहोचू नये आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बुधवारी सकाळपासूनच उचगावच्या चोहोबाजूंनी गावात ये-जा करणाऱ्या प्रमुख मार्गांवर बॅरिकेड्स उभे करून चोख पोलीस बंदोबस्त ठेवून गावात अशा संघटनांनी शिरकाव करू नये, याची पूर्ण दखल घेतली. उचगावच्या प्रवेशद्वारामध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वाऊढ पुतळा असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ही उचगावची शान आहे. या गावात ये-जा करणाऱ्या बेळगाव डेपोच्या बसेस व इतर वाहने वळविण्यासाठी चौक महत्त्वाचा भाग ठरतो. सध्या या भागात कोणत्याही इतर प्रकारची अडचण झाल्यास या चौकाची शोभा कमी होणार, याबरोबरच अडचण होणार आहे. ती होऊ नये यासाठीच उचगाव ग्राम पंचायतीने एक वर्षापूर्वीच या चौकात कोणीही कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये, असा सर्वानुमते ठराव करण्यात आला आहे. मात्र गेल्या एक वर्षापासून याच चौकात संगोळ्ळी रायाण्णांचा पुतळा बसविण्यासाठी गावापेक्षा बाहेरील संघटनांचाच हेकेखोरपणा दिसून येत आहे.

Advertisement

यासाठीच उचगाव ग्राम पंचायतने ठोस पावले उचलत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना अशा प्रकारची निवेदने दिली. गावात कोणत्याही प्रकारचा ताण, तणाव वाढू नये, गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी, अशा प्रकारचे निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे. याचीच दखल घेत सदर खात्याने बुधवारी बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील उचगाव फाटा, तसेच गोजगेमार्गे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गावात शिरकाव करू नये, यासाठी सदर मार्गावरही बॅरिकेड्स लावून गावात कोणालाही शिरकाव करायला दिला नाही. उचगाव ग्राम पंचायत,ग्रामस्थ व या भागातील विविध संघटनांच्यावतीने उचगावच्या प्रवेशद्वारातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अशा प्रकारची कोणतीही पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, कोणतेही पुतळे वगैरे बसविण्यात येऊ नयेत, याची शासनाने दखल घ्यावी आणि उचगाव ग्रामस्थांना सहकार्य करावे. उचगावमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असताना विनाकारण बाहेरील संघटनांनी गावातील शांतता भंग करू नये, यासाठी शासनानेच आता योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

Advertisement
Tags :

.