अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी पोलीस खाते सज्ज
सहा हजारांहून अधिक अधिकारी-पोलीस तैनात : शहराला पोलीस छावणीचे स्वरुप; आंदोलनकर्त्यांसाठीही नियमावली
बेळगाव : सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सहा हजारहून अधिक अधिकारी व पोलिसांना बंदोबस्तासाठी जुंपण्यात आले आहे. त्यामुळे बेळगावला छावणीचे स्वरुप आले आहे. नेहमीप्रमाणे यंदाही सुवर्ण विधानसौध परिसरात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी वेगवेगळ्या संस्था, संघटना आंदोलने करणार आहेत. बंदोबस्तासाठी 3,820 हून अधिक पोलीस, 146 अधिकारी यांच्याबरोबर 8 क्युआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम), राज्य राखीव दलाची 35 प्रहार पथके, गरुडा फोर्स, स्फोटकांच्या तपासणीसाठी 16 पथके तैनात करण्यात आली आहेत. बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांसाठी तंबू उभारण्यात आले असून थंडीमुळे त्यांना आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी पंचमसाली समाजबांधव रस्त्यावर उतरले होते. त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समाजातील काही प्रमुखांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशावरून चौकशी समितीही नियुक्ती करण्यात आली होती. निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने दोन दिवसांपूर्वीच गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना अहवाल सुपूर्द केला आहे. सरकारला ऊस उत्पादक शेतकरी, पंचमसाली आंदोलकांचा पवित्रा काय असणार, याची चिंता आहे. पंचमसाली समाजबांधवांनी यंदा 10 डिसेंबर रोजी गेल्या वर्षी झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मौन आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. आंदोलक व पोलीस यांच्यात अनेक वेळा धुमश्चक्री झाल्याची उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली आहे.