कळंगुट येथे पोलिसांनी शॅक पाडले बंद
मध्यरात्री कारवाई, शॅकधारकांची गॉडफादरांकडे धाव, राजकीय दबावाला बळी न पडता पर्यटन पोलिसांची कारवाई
गिरीश मांद्रेकर/ म्हापसा
कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील एका शॅकसमोर शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पर्यटकांच्या गटाला मारहाणीची घटना घडली आहे. याप्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पूर्णत: कळंगुट ते बागा दरम्यान सर्व शॅक बंद पाडल्याने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या सर्व शॅकवर सर्वत्र काळोख पहायला मिळाला.
ऐन वीकएन्डला ही कारवाई करण्यात आल्याने शॅकधारकांचे बरेच नुकसान झाले असले तरी या शॅकमालकांना शिस्त यावी म्हणून हा बडगा उगारल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. शॅक बंद न करता थोडा अवधी द्यावा, अशी मागणी करणारे राजकीय नेत्यांचे फोन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आले, मात्र पोलिसांनी त्याकडे लक्ष न देता आमच्या कारवाईत अडथळा नको असे सांगून त्यांची मागणी फेटाळून लावल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन पोलिस निरीक्षक जतीन पोतदार यांच्यासह उपनिरीक्षक दत्तप्रसाद नानोडकर व कळंगुट पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.
समुद्रकिनाऱ्यावर रात्री सर्वत्र कडक पोलिस गस्त
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पर्वरी येथील आपल्या कार्यालयात शॅकधारकांना बोलावून पर्यटकांना मारहाण केल्याप्रकरणी बरेच धारेवर धरून खडसावले होते. इतकेच नव्हे तर पर्यटकांशी गैरवर्तन कराल तर खबरदार असा इशाराही दिला होता. त्यानंतर पर्यटन तसेच कळंगुट पोलिस निरीक्षकांना तसेच उपअधीक्षक विश्वास कर्पे आदी अधिकाऱ्यांना बोलावून अधीक्षकांनी पर्यटकांना होणाऱ्या मारहाणीच्या वाढत्या घटनांबाबत खंतही व्यक्त करून त्यांनाही धारेवर धरले होते. या भागात कडक गस्त घालावी तसेच शॅकधारकांच्या बाजूला सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे फोन नंबर टाकून नामफलक तयार करावेत, असा आदेशही दिला होता. मुंबई येथील पर्यटकांना झालेल्या मारहाणीमुळे अधीक्षक बरेच संतप्त झाले आहेत. सलग दोनवेळा अशा घटना घडल्याने पोलिसांबरोबर गृहखात्याचे नावही बदनाम झाले आहे. मुख्यमंत्री तसेच पर्यटन मंत्रीही याप्रकरणी बरेच संतप्त झाल्याचे सांगण्यात आले.
मालक कामगारांवर व्यवसाय सोडून घरी जातात
सूत्रांनी याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार, किनारी भागात शॅकमालक कमिशनवर आपल्या शॅकमध्ये वेटर आणतात. रात्री शॅक त्यांच्या स्वाधीन करून आपण घरी जातात. एका शॅकवर वेटर म्हणून 30 ते 40 वेटर असतात. त्यामुळे ग्राहक आल्यावर त्यांची चांदी होते. कमिशनपोटी ते आपली पोळी भाजण्यासाठी ग्राहकांशी गैरवर्तन करतात, असे आढळून आले आहे.
वास्तविक शॅक धोरणानुसार सर्व शॅक 11 वाजता बंद ठेवायला पाहिजे. त्याचा आधार घेऊन रात्री 12 वाजल्यानंतर कळंगुट ते बागा दरम्यान सर्व शॅक पूर्णत: बंद करण्यात आले आहे. एकट्यासाठी सर्वांना त्रास का? असा प्रश्न शॅक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला असला तरी संघटना असल्यास मारहाण कशी होते याचे उत्तर प्रथम द्या, असे त्यांना जाब विचारला.
वेटर कमावतात दिवसाला 3 हजार रु.
शॅकधारक मालक या कामगारांना महिन्याकाठी अमूक मानधन असे न ठेवता त्यांना कमिशनवर ठेवतात. त्यामुळे रेटकार्ड नाही तोंडाला येईल तो रेट लावतात. हुक्कासाठी 4 ते 5 हजार नंतर बिलांसाठी भांडण. बिल देत नसल्यास त्यांना मारहाण करतात. एक कामगार 15 हजार घेतात असे 10 कामगार ठेवल्यास सर्वकाही सुरळीत होते मात्र हे 50 जण ठेवतात हे सर्व कमिशनवाले. हुक्का घातला की 200 ऊपये प्रति माणसी कमिशन, मासे घातले की प्रति 100 ऊपये कमिशन यामुळे ते गब्बर होतात. एका रात्रीला हे कामगार दोन ते तीन हजार घरी घेऊन जातात. अशा प्रकारे ते महिन्याकाठी 70 हजार ऊ. कमावतात. इतकेच नव्हे तर मूळ गावी जाताना पर्यटकांच्या महागड्या वस्तू, भ्रमणध्वनी चोरून नेतात, अशी माहिती हाती आली आहे. मार्च एप्रिलमध्ये अशा तक्रारी जास्त आढळून येतात. फ्राय बांगडा प्रति 1 हजार रु. असा विकला जातो