नवीन आकृतीबंधानुसार पोलीस शिपाई भरती; 23 हजार 628 पदे भरणार
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती : काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या लक्षवेधी दिले उत्तर
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्याच्या गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन आकृतीबंधानुसार 23 हजार 628 पोलीस शिपाई पदे भरली जाणार असल्याची माहीती विधानपरिषदेत दिली.
गृहविभागातील 1976 पासून आकृतीबंधानुसार पदभरती केली जात होती. सध्या लोकसंखेनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजेत याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगीतले. नवीन भरण्यात येण्राया पोलीस शिपाई पदासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापूर्वी 8400 उमेदवारांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती. त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. कोरोना काळात भरती न झाल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार निराश झाले होते. याबाबत गृहविभागाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन गृहमंत्री फडणवीस यांनी दिले.
सीसीटीव्ही फुटेजबाबत निकष तयार करण्याचे प्रयत्न
सीसीटीव्हीचे फुटेज कोणालाही उपलब्ध होत आहे. यामुळे एखाद्या व्यकीचे खाजगी आयुष्य धोक्यात येवू शकते याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले असता मंत्री फडणवीस यांनी हा मुद्दा रास्त आहे. याबाबत गृहविभागाशी चर्चा करून निकष करण्यासंदर्भात प्रयत्न करू असे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सायबर गुन्हासाठी डायनॉमिक प्लॅटफॉर्म
सायबरच्या वाढत्या गुन्हयासंदर्भात आमदार सतेज पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस यांनी सायबर गुह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात जगातील सर्वात डायनॅमिक प्लॅटफार्म तयार केला जात आहे. एकहजार प्रशिक्षित कर्मचाऱ्याचा समावेश असलेला सायबर फोर्स निर्माण करणार असल्याची त्यांनी दिली.