पोलीस प्रमुखांच्या बनावट फेसबुक अकाऊंटचे धागेदोरे राजस्थानपर्यंत!
बेळगाव : जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट उघडणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा छडा लावण्यात आला आहे. जिल्हा सीईएन पोलिसांनी राजस्थानमधील एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. केवळ बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखच नव्हे तर गदग,मंड्या जिल्हा पोलीस प्रमुखांच्या नावेही फेसबुकवर बनावट अकाऊंट उघडून या महाभागाने त्यांच्या मित्र परिवाराला ठकविण्याचे प्रयत्न सुरू केले होते. सावधगिरीमुळे गुन्हेगारांचा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे उत्तरप्रदेश, राजस्थानपर्यंत पोहोचले असून सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले.
आठ दिवसांपूर्वी डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या नावे त्यांच्या मित्र परिवाराला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आली. त्यानंतर पोलीस प्रमुखांच्या नावे मेसेज सुरू झाले. आपण पोलीस प्रमुखांचे मित्र आहोत. सीआरपीएफमध्ये नोकरी करतो. बेंगळूरमधून आपली बदली झाली आहे. आपल्याजवळ तब्बल 12 लाखाचे फर्निचर आहे. केवळ 90 हजारामध्ये ते फर्निचर देणार आहे, असे मेसेज करून फर्निचर विकण्याच्या नावे फसवणुकीला सुरुवात करण्यात आली. हा प्रकार जिल्हा पोलीस प्रमुखांच्या लक्षात येताच जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.