पोलिसांनी मोडले मटका बुकींचे कंबरडे
अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी उघडली मोहीम : शहरात दोन दिवसांत15 मटका बुकींना अटक
बेळगाव : पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी शहरातील अवैध धंदे हद्दपार करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे मटक्याच्या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली असून विविध ठिकाणी सोमवारी व मंगळवारी छापेमारी करण्यात आली आहे. दोन दिवसांत तब्बल 15 जणांना अटक करून 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 42 हजार 50 रुपये व दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मटका धंद्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी दुपारी कणबर्गी रोड येथे सार्वजनिक ठिकाणी थांबून मटका घेणाऱ्या सिद्राई भावकाण्णा शिगिहळ्ळी, भैरगौडा पाटील (दोघेही रा. कणबर्गी) यांना सीसीबीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून रंगेहाथ अटक केली. त्यावेळी त्यांच्याकडून 9540 रुपयांची रोकड जप्त करण्यासह त्यांच्याविरोधात माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी कारवाई खंजर गल्ली येथील मोडका बाजारनजीक मार्केट पोलिसांनी केली. त्याठिकाणी सार्वजनिक ठिकाणी थांबून मटका घेणाऱ्या चंद्रशेखर भरमाप्पा व्यंकटण्णवर (रा. रामतीर्थनगर), प्रशांत व्यंकटेश रेवणकर (रा. पाटील गल्ली, वडगाव), फईम जिलानी कोतवाल (रा. खंजर गल्ली) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 2610 रुपयांची रोकड जप्त केली आहे. तिसरी कारवाई सायंकाळी पॅटसन शोरूमजवळ शहापूर पोलिसांनी केली. त्याठिकाणी मटका घेणाऱ्या सद्दाम मेहबूब कागजी (रा. तांबिटकर गल्ली, बेळगाव), अश्पाक दादापीर सनदी (रा. बेळगाव), विनोद मोहन मॅगीनमनी (रा. ओल्ड पी. बी. रोड शहापूर) यांना अटक करून त्यांच्याकडून 1200 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार यांनी यमनापूर येथील पाण्याच्या टाकीजवळ मटका घेणाऱ्या बसवराज शिवलिंग परकी (रा. होनगा), कानाप्पा सिद्दाप्पा हालभावी (रा. मुत्यानट्टी), रवींद्र खटावकर (रा. शहापूर) यांना अटक केली. त्यांच्याकडून 17,590 रुपयांची रोकड जप्त करण्यासह त्यांच्याविरोधात माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक लकाप्पा जोडट्टी यांनी मच्छे गावानजीकच्या अशोका प्लांट नं. 3 जवळ मटका घेणाऱ्या दोघांना अटक केली. श्रीकांत जोमा सनदी (रा. देवगिरी), फकिराप्पा बाळाप्पा निर्वानी (रा. मार्कंडेयनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 4200 रुपयांची रोकड व मटका साहित्य जप्त केले आहे.
मारिहाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या मुचंडी गावातील पोल्ट्री फार्मजवळ मटका घेणाऱ्या विनायक भावकाण्णा मोटारे (रा. संभाजी गल्ली, मुचंडी) याला मारिहाळ पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. त्याच्याकडून 2660 रुपयांची रोकड जप्त केली आहे. सोमवारी एकाच दिवसात तब्बल सहा ठिकाणी छापेमारी करून 14 मटका बुकींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 37,300 रुपयांची रोकड व दोन मोबाईल संच जप्त केले आहेत. मटका विरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली असून खंजर गल्ली येथील एका दुकानानजीक थांबून मटका घेणाऱ्या बुकीला मंगळवारी मार्केट पोलिसांनी अटक केली. मोहम्मदशफी मोदीनसाब ताशिलदार याला अटक करून 4750 रुपयांची रोकड जप्त केली. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शहरातील सर्व अवैध धंदे हद्दपार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली असल्याने पोलीस कामाला लागले आहेत.
अवैध धंदे हद्दपार करा
पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मटका, तसेच इतर प्रकारचे सर्व अवैध धंदे हद्दपार करण्याची सूचना केली आहे. दररोज अवैध धंद्याविरोधात कारवाई सुरूच ठेवण्याची सूचना केली असून सोमवारपासून अवैध धंद्याविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. भविष्यातदेखील ही कारवाई सुरू राहणार असून अवैध धंद्यामध्ये गुंतलेल्यांचे कंबरडे मोडले जाईल.
-भूषण गुलाबराव बोरसे, पोलीस आयुक्त