निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून वाहनांची कसून चौकशी सुरु
वार्ताहर/ कुडाळ
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने लागू असलेल्या आचासंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या पोलीस यंत्रणेकडून याबाबत जोमाने काम सुरु आहे. पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक पोलीस चेकपोस्टवर चारचाकी वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी पोलीस चेकपोस्ट येथे पिंगुळी-पाट-परुळे मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या चारचाकी वाहनांची पोलीसांकडून कसून चौकशी सुरु आहे. निवडणूकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत पोलीस कॉनस्टेबल एस. पी. भुजबळ, एस. एस. टी. पथकचे संतोष राऊळ, सत्यवान बोवलेकर, रोहित जाधव सहभागी झाले आहेत.निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चोख राखण्याच्या दृष्टीने व समाजात शांतता राखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे. सध्या शाळांना दिवाळीची सुट्टी असल्यामुळे या मार्गावरून चिपी-परुळे विमानतळाकडे तसेच निवती, खवणे, भोगवे आदी ठिकाणी जाणाऱ्या- येणाऱ्या पर्यटकांची रहदारी जोरात सुरु आहे. या मार्गावरून नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांची रेल-चेल सुरु असते. ही निवडणूक निर्भय, शांत आणि न्याय्य वातावरणात पार पाडावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये खबरदारी म्हणून पोलीस यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहे. चार चाकी वाहनातून होणारी अवैध दारू, शस्त्र, रोख रक्कम, अमली पदार्थ व आदी वाहतूक यावर प्रभावी कारवाई होणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने प्रत्येक वाहनांची चौकशी करून त्यांच्या संशयास्पद हालचालीवर पोलीस यंत्रणा अगदी बारकाईने लक्ष ठेऊन आहे.