दोघे जखमी : कारवार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैतखोल येथील घटना : 11 जणांना ताब्यात
कारवार : ड्युटीवरील दोन पोलिसांना युवकांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री कारवार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैतखोल येथे घडली आहे. जखमी पोलिसांची नावे गणेश कुरीयवर आणि हरीश गवाणीकर अशी आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. या प्रकरणी अकरा युवकांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या युवकांची नावे सुनील गौडा, मंजुनाथ गौडा, संदेश गौडा, रघुवीर गौडा, नितीन गौडा, गगन गौडा, अनुराग गौडा, नितेश गौडा, सुचीत गौडा, युवराज गौडा आणि उमेश जनकप्रसाद अशी आहेत. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, कारवार शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कुरीयवर आणि गवाणीकर शनिवारी रात्री बैतखोल भागात गस्त घालत होते. सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास बैतखोल येथील मुदेनी मंदिराजवळ काही युवक थांबल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना दिसले. त्यावेळी पोलिसांनी त्या युवकांना घरी निघून जाण्याची सूचना केली. त्यावेळी त्या युवकांनी पोलिसांना नारळ आणि बाटल्यांनी मारहाण करून त्यांचा युनिफॉर्मही फाडला. या घटनेत दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दिवाळी सणाच्या आदल्या रात्री घडलेल्या या घटनेने बैतखोल भागात खळबळ माजली आहे. कारवार शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.